दुधाला आधारभूत किंमत देण्याच्या मागणीसाठी दूध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन !

किसन सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नगर – दळणवळण बंदीचा अपलाभ घेऊन दूध संघांनी दुधाचे भाव पाडले. त्याची चौकशी करून भविष्यात दुधाचे भाव स्थिर रहावेत यासाठी दुधाला आधारभूत किंमत  (एफ्.आर्.पी.) ठरवून द्यावी, या मागणीसाठी किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांनी
राज्यभर आंदोलन चालू केले आहे. नगर जिल्ह्यात किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अंबड येथे आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकर्‍यांनी गावातून मोर्चा काढून घोषणाबाजी केली.

आंदोलकांनी केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

१. सर्व दूध संघांचे लेखापरीक्षण व्हावे. दुधाची मागणी किती घटली आणि किती दर अल्प केले याची सखोल चौकशी करावी.

२. लूटमार करणार्‍या खासगी आणि सहकारी दूध संघांवर कारवाई करून शेतकर्‍यांना नुकसानीची रक्कम परत द्यावी.

३. लुटमार टाळण्यासाठी खासगी आणि सहकारी दूध संघांना लागू होईल, असा कायदा करावा.

४. दूध व्यवसायाला साखर धंद्याप्रमाणे रेव्हेन्यू शेअरिंग आणि किमान हमी दर, असे दुहेरी संरक्षण लागू करावे.

५. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शून्य व्याजदराने शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे.

६. कोरोनाचे संकट अद्यापही संपले नसल्याने शासकीय यंत्रणेच्या वतीने सर्वांचे विनामूल्य लसीकरण करावे.