भगवान शिव आणि पार्वती यांचे प्रणयक्रीडा करतांनाचे चित्र असलेले भ्रमणभाषचे ‘कव्हर’ ऑनलाईन विक्रीसाठी ठेवून फ्लिपकार्ट’ कडून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा घोर अवमान

हिंदु जनजागृती समितीच्या आवाहनानंतर ‘फ्लिपकार्ट’ने संकेतस्थळावरून ‘कव्हर’ हटवले !

  • हिंदुद्वेषी ‘फ्लिपकार्ट’ने अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असे चित्र असलेले भ्रमणभाषचे ‘कव्हर’ विक्रीस ठेवण्याचे धारिष्ट दाखवले असते का ? हिंदूंनी त्यांच्या श्रद्धास्थानांचे कुणीही विडंबन करू धजावणार नाही, अशी पत निर्माण केली पाहिजे !
  • हिंदूबहुल भारतात वारंवार हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या आस्थापनांवर सरकार बंदी का घालत नाही ?
‘फ्लिपकार्ट’ने विक्रीसाठी ठेवलेले आक्षेपार्ह ‘कव्हर’

मुंबई, १६ जून (वार्ता.) – ‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनाने त्यांच्या संकेतस्थळावर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे प्रणयक्रीडा करतांनाचे चित्र असलेले भ्रमणभाषचे ‘कव्हर’ ‘ऑनलाईन’ विक्रीसाठी ठेवले होते. हिंदु जनजागृती समितीने केलेल्या आवाहनानंतर ‘फ्लिपकार्ट’ने त्यांच्या संकेतस्थळावरून हे ‘कव्हर’ हटवले आहे. (हिंदु जनजागृती समितीचे हे सुयशच आहे ! – संपादक) 
‘फ्लिपकार्ट’कडून ‘सॅमसंग’ या आस्थापनाच्या भ्रमणभाषचे हे ‘कव्हर’ सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध होते. या ‘कव्हर’वर असलेल्या चित्रामध्ये मस्तकावर चंद्र, गळ्यात नाग, हातात त्रिशूळ, शरिरावर रूद्राक्षांच्या माळा असे जटाधारी शिव हे माता पार्वतीसमवेत प्रणयक्रीडा करतांना दाखवण्यात आले होते. याविषयी हिंदु जनजागृती समितीने ‘ट्विटर’वर माहिती देऊन या चित्रामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून हे ‘कव्हर’ त्वरित हटवण्याचे आवाहन केले. हिंदु जनजागृती समितीच्या या आवाहनाला अनेक धर्माभिमानी हिंदूंनी पाठिंबा देऊन ‘फ्लिपकार्ट’च्या हिंदुद्रोही कृतीचा निषेध केला, तसेच त्यांनीही हे ‘कव्हर’ संकेतस्थळावरून हटवण्याची मागणी केली. शेवटी ‘फ्लिपकार्ट’ने हे ‘कव्हर’ संकेतस्थळावरून हटवले. (देवतांच्या विडंबनेच्या विरोधात आवाज उठवणार्‍या जागरूक धर्माभिमानी हिंदूंचे अभिनंदन ! अन्य हिंदूंनीही यातून बोध घ्यावा ! – संपादक)

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक