छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर येथे मूक आंदोलन !

छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर, १५ जून (वार्ता.) – छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी १६ जून या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीजवळ मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर संभाजीराजे यांनी १५ जून या दिवशी आंदोलनस्थळी पहाणी केली. या संदर्भात संभाजीराजे म्हणाले, ‘‘आंदोलनात सहभागी लोकप्रतिनिधींना आपण सन्मानपूर्वक वागणूक द्यायची; कारण ते आपल्यासाठी येथे येणार आहेत. आंदोलनासाठी राज्यभरातील समन्वयक येणार आहेत. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवून हे आंदोलन करू. आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही. कोल्हापूरकरांनी समाजाला नेहमी एक दिशा दिली आहे.’’

१. या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून त्यामध्ये सहभागी होणार आहे, असे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

२. पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘संभाजीराजे यांना आंदोलन करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांनी आंदोलन करावे; मात्र कोरोना वाढणार नाही, ही काळजी घेऊन करावे. ५ जुलैला होणार्‍या राज्याच्या अधिवेशनात मराठा आरक्षण सूत्रावर चर्चा होणार आहे.’’