नागरिकांच्या जिवाशी खेळणारे असंवेदनशील महापालिका प्रशासन !
सांगली, १३ जून (वार्ता.) – दळणवळण बंदीच्या काळात महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही कुत्री केवळ माणसांनाच त्रास देतात असे नाही, तर गाड्यांची नासधूस कर, परिसर खराब कर यांसह पाळीव प्राण्यांनाही त्रास देत आहेत. ही कुत्री विशेषकरून घोळक्याने फिरतात आणि अचानक कुणावरही आक्रमण करतात. भटक्या कुत्र्यांमुळे महापालिका क्षेत्रात कुणाचा तरी जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे का ? असा संतप्त प्रश्न माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. (प्रशासकीय अधिकार्यांनी ते सामान्य नागरिकांच्या कररूपी पैशांतूनच वेतन घेतात याची जाण ठेवावी. तसेच भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा ! – संपादक)
श्री. शिंदे यांनी या पत्रकात म्हटले आहे की, कायद्यानुसार या कुत्र्यांना ठार मारता येत नाही. भटक्या कुत्र्यांची महापालिका प्रशासन नसबंदी करते; मात्र ती अत्यंत मर्यादित स्वरूपात आहे, तसेच या भटक्या कुत्र्यांना दूर सोडण्यास काही प्राणीमित्र विरोध करतात. त्यामुळे नसबंदी झालेल्या कुत्र्यांची संख्याही वाढत आहे. यापुढील काळात कुत्र्यांना दूर सोडण्यास प्राणीमित्रांनी विरोध केल्यास त्यांच्या घरात भटकी कुत्री सोडण्यात येतील. महापालिका क्षेत्रात २० सहस्रांच्या आसपास भटकी कुत्री असून प्रत्येक वर्षी १ ते २ सहस्र कुत्र्यांचीच नसबंदी होती. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना काढावी.