ज्या डॉक्टरांनी अंतिम परीक्षाच दिलेली नाही, त्यांच्याकडे रुग्णांचे दायित्व कसे सोपवता येईल ? – सर्वोच्च न्यायालय

पदव्युत्तर वैद्यकीय अंतिम परीक्षा रहित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली !

नवी देहली – देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय (पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल) अंतिम परीक्षा रहित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आम्ही परीक्षा रहित करण्याचा आदेश देऊ शकत नाही; कारण हे शैक्षणिक धोरणाचे प्रकरण आहे. ज्या डॉक्टरांनी अंतिम परीक्षाच दिली नाही, त्यांच्याकडे रुग्णांचे दायित्व कसे सोपवता येईल ? असेही न्यायालयाने या वेळी म्हटले.
अंतिम वर्षातील काही डॉक्टरांनी याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. त्यांनी परीक्षा रहित करून अंतर्गत मूल्यांकनावर आधारित निकाल देण्याची मागणी केली होती. या संदर्भात संयुक्त तज्ञांची एक समिती स्थापन करण्याच्या मागणीवर न्यायालयाने केंद्र सरकार आणि एम्स रुग्णालय यांना नोटीस बजावून त्यांचे मत मागितले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी १८ जून या दिवशी होणार आहे.