कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत लहान मुलांसाठी ७ सहस्र खाटांची सिद्धता !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संभाजीनगर – कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे सांगण्यात येत असल्याने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत ७ सहस्र खाटा सिद्ध करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अलीकडेच या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बैठक घेतली असून प्रत्येक जिल्ह्यात बालरोगतज्ञांचा ‘कार्यबल गट’ही स्थापित करण्यात आला आहे.

१. कोरोनाची दुसर्‍या स्तरातील लक्षणे दिसणार्‍या दशलक्ष लोकसंख्येमागे किमान २०० खाटांची व्यवस्था करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यात ८२० खाटा निर्माण करण्यात आल्या आहेत, तर गंभीर रुग्णांसाठी प्रतिदशलक्ष ३० अतीदक्षता कक्षातील खाटांची सोय केली जाणार आहे. मराठवाडा येथे ही संख्या नव्याने ५८५ ने वाढवली जाणार आहे, तर ‘ऑक्सिजन’ची सुविधेच्या खाटांची संख्या ४ सहस्र १०० ने वाढवण्यात येणार आहे.

२. १८ वर्षांखालील मुलांची संख्या, कोरोनाचा संसर्ग झाल्यास किती जणांना ‘ऑक्सिजन’ची आवश्यकता लागेल ? किती नवजात शिशूंना श्वसनयंत्र लागू शकतात ? याचा अंदाज घेऊन सिद्धता केली जात आहे. मराठवाडा येथील मार्च २०२० ते २०२१ या कालावधीमधील प्रसुतींची संख्या ३ लाख १० सहस्र ५६ एवढी होती. या संख्येचा विचार करून नवजात मुलांसाठी स्वतंत्र खाटांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

३. मराठवाड्यात शिशूदक्षता विभागात १ सहस्र २४६ मुलांची सोय केली जाणार आहे. लहान मुलांसह त्यांच्या मातांसाठी खाटांची सोय केली जाणार आहे. ही संख्या २ सहस्र ४७१ पर्यंत वाढवली जाणार आहे.