तज्ञांनी प्रयत्न करूनही ‘व्हेंटिलेटर्स’ चालू झाले नाहीत !

संभाजीनगर येथील ‘व्हेंटिलेटर्स’ नादुरुस्त असल्याचे प्रकरण

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संभाजीनगर – अनुमाने दीड मासांपूर्वी पंतप्रधान निधीतून कोरोना रुग्णांसाठी घाटी रुग्णालयात आलेले ‘व्हेंटिलेटर्स’ चालू करण्यासाठी देहली येथील ज्योती सी.एन्.सी आस्थापनाचे अभियंते, पुरवठादार आणि आधुनिक वैद्य यांनी बरीच खटपट केली; मात्र त्यांना ‘व्हेंटिलेटर्स’ चालू करण्यात यश आले नाही. अखेर त्यांनी खासगी रुग्णालयाला दिलेल्या ‘व्हेंटिलेटर्स’ची पडताळणी करण्याचे ठरवले.

१. १२ एप्रिल या दिवशी एका ट्रकमधून संभाजीनगर येथे ज्योती सी.एन्.सी आस्थापनाचे १०० ‘व्हेंटिलेटर्स’ आले होते. त्यातील काही घाटी रुग्णालयाला, तर काही परभणी, हिंगोली जिल्हा रुग्णालयांना देण्यात आले.

२. केंद्र सरकारचे अधिवक्ता अजय तल्हार यांनी ‘खंडपिठात शपथपत्र प्रविष्ट करून हे ‘व्हेंटिलेटर्स’ पंतप्रधान निधीतून नाहीत’, असा दावा केला होता. ‘जागतिक दर्जानुसार सिद्ध केलेल्या ‘व्हेंटिलेटर्स’ची हाताळणी करणारे तज्ञ आधुनिक वैद्य घाटी रुग्णालयाकडे नाहीत’, असेही त्यांनी म्हटले होते.

३. न्यायालयाच्या आदेशानंतर ३ जून या दिवशी देहली येथील सफदरजंग रुग्णालयातील आधुनिक वैद्य रूपेश यादव आणि आधुनिक वैद्य अरीन चौधरी घाटी रुग्णालयात आले. त्यांनी ४ घंटे बराच खटाटोप केला; पण त्यांनाही एकही ‘व्हेंटिलेटर’ चालू करता आले नाही.

४. औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले की, देहली येथून आलेल्या पथकाला आम्ही ‘व्हेंटिलेटर्स’ दाखवले. त्यांच्या कामात हस्तक्षेप नको. त्यांना निःपक्षपातीपणे काम करता यावे, यासाठी आम्ही ‘व्हेंटिलेटर्स’ दाखवून आमच्या कामाला निघून गेलो होतो.

५. ‘व्हेंटिलेटर’चे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केंद्र सरकारचे पथक पहाणीसाठी आले आहे. त्या संदर्भात आम्ही काहीही बोलणे योग्य नाही. याप्रकरणी आता केवळ न्यायालय बोलेल’, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.