जागतिक आरोग्य संघटना धाराशिव येथे १०० खाटांचे फिरते कोविड रुग्णालय उभारणार

(प्रतिकात्मक छायाचित्र)

धाराशिव – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून देशातील पाच राज्यांत प्रत्येकी एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर फिरती रुग्णालये चालू करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील हे एकमेव १०० खाटांचे रुग्णालय धाराशिव येथे लवकरच चालू होत आहे. यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले असून आवश्यकतेनुसार शहरात किंवा ग्रामीण भागात हे रुग्णालय कमी वेळेत हालवता येते. झारखंड, आसाम, ओडिशा, बिहार आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यांत हा प्रयोग राबवण्यात येत आहे.

१. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शासनाच्या सहभागातून फिरत्या रुग्णालयाची ही संकल्पना पुढे आली आहे. महानगरांमध्ये अनेक ठिकाणी कोरोना वरील उपचारांसाठी तंबूमध्ये कोरोना सेंटर उभारण्यात आले आहेत; परंतु तातडीच्या उपचारांसाठी अद्ययावत सुविधांसह तंबूत उभारलेले हे पहिलेच रुग्णालय असेल. यामध्ये खाटांसह ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’, ‘व्हीलचेअर’, ‘स्ट्रेचर’सह सर्व साहित्य संघटनेने पुरवले आहे. केवळ मनुष्यबळ, औषधे आणि वीजपुरवठ्याशी संबंधित साहित्य जिल्ह्याच्या प्रशासनाने पुरवावे, असे अपेक्षित आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर  ग्रामीण भागांतही अशा फिरत्या रुग्णालयाचा चांगला उपयोग होऊ शकेल.

२. भव्य तंबूमध्ये उभारण्यात येणार्‍या या रुग्णालयाचा कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर अन्य आजारांवरील उपचारांसाठीही उपयोग होऊ शकेल. धाराशिव जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असे रुग्णालय उभारण्याचे नियोजन असून यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नियोजनानुसार दोन दिवसांत घेतला जाईल, असे कोविड विभागाचे नोडल अधिकारी डॉ. आसिफ मुल्ला यांनी सांगितले.