लसीकरणातील अनागोंदीला लागणार पोलिसांचा चाप ?

(प्रातिनिधिक छायाचित्र)

सातारा, १ जून (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून कस्तुरबा लसीकरण केंद्रावर नियोजन केलेले असूनही २ दिवसांपूर्वी लसीकरणाचे टोकन वाटपावरून गोंधळ निर्माण झाला होता. नगरसेवक अविनाश कदम यांनी लसीकरणामध्ये वशीला लावला जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे शाहूपुरी पोलीस कस्तुरबा लसीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांना सूचना देत अनागोंदी कारभाराला चाप लावण्याचा प्रयत्न करणार आहेत.

नगरसेवक अविनाश कदम यांच्या तक्रारीची नोंद घेत स्वत: मुख्याधिकारी अविनाश बापट यांनी टोकन तपासले होते. तेव्हा त्यांना अनुक्रमांकानुसार टोकन आढळून आले नाहीत. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी टोकन घेतलेल्यांचे म्हणणे समजून घेतले, तसेच याविषयी शाहूपुरी पोलिसांना समजल्यावर त्यांनी आरोग्य कर्मचार्‍यांना बोलावून माहिती घेतली. तसेच लसीकरण केंद्रावर अनागोंदी न करता, कोणताही वशीला न लावता लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. लसीकरणामध्ये कोणी अनागोंदी, वशीलेबाजी करत असल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असेही पोलिसांनी आरोग्य कर्मचार्‍यांना ठणकावले.