अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग गतीने होण्यासाठी आमचा प्रयत्न ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

आढावा बैठकीत बोलतांना जलसंपदामंत्री जयंत पाटील

कोल्हापूर, ३१ मे – अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग गतीने होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पावसाळ्यात ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या तुकड्या तैनात केल्या जातील. या वर्षीपासून गाव आणि शहर येथील पाणी पातळी किती वाढेल ? किती घरांना फटका बसेल ? तसेच आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांचे स्थलांतर कसे करावे ? याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासाठी येत्या १० ते १५ दिवसांत याचा नकाशा सिद्ध केला जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांची ३१ मे या दिवशी पूरनियंत्रण आणि काळजी कशी घ्यावी ? याची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की,

१. अतीवृष्टी होऊन नद्यांना पूर आला, तर त्याविषयी विशेष काळजी घेतली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि महसूल विभाग आतापासून दक्ष आहे. कर्नाटक राज्याच्या आपण संपर्कात आहोत. काही दिवसांपूर्वी कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांच्या जलसंपदामंत्र्यांची बैठक झाली आहे. भविष्यात अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग किती होणार ? यावर चर्चा केली जाणार आहे.

२. गावागावात पुराचा फटका बसतो. अशावेळी ग्रामपंचायती किंवा ग्रामसमित्यांना खबरदारीच्या योग्य त्या सूचना दिल्या जातील. कोवाडसारख्या गावात छोट्या धरणामुळे पाणी शिरते. या पार्श्‍वभूमीवर अगोदरच गाव खाली करण्याच्या सूचना दिल्या जातील.

३. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर स्थलांतर करतांना काळजी घ्यावी लागेल; पण सध्या स्थलांतर करावे लागेल अशी परिस्थिती नाही. गेल्यावर्षी आपण पुरातून सुखरूप बाहेर पडलो. या वर्षी किती पाऊस पडतो, हे पहायला हवे.