५० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या आरे दुग्ध वसाहतीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या घरातून ३ कोटी ४६ लाख १० सहस्र रुपयांची रोकड हस्तगत !

कोट्यवधी रुपये हडप करणार्‍या लाचखोरांची सर्व संपत्ती हस्तगत करावी ! लाचखोरांना कठोरात कठोर शासन झाल्यासच कुणी लाच मागण्याचे धाडस करणार नाही !

मुंबई, २६ मे (वार्ता.) – आरे दुग्ध वसाहतीमधील एका रहिवाशाला घराच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त आवश्यक अनुमती देण्यासाठी वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथु राठोड यांनी ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम राठोड यांच्या समक्ष घेतांना शिपाई अरविंद तिवारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले.

राठोड आणि तिवारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर राठोड यांच्या घराची झडती घेतली असता तेथून ३ कोटी ४६ लाख १० सहस्र रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.