गोवा खंडपिठाच्या हस्तक्षेपानंतर राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासन सक्रीय : गोवा खंडपिठाला सुपुर्द केला अहवाल

पणजी, १४ मे (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर शासन राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. राज्यशासनाने १४ मे या दिवशी या दृष्टीनेे केलेल्या प्रयत्नांचा अहवाल गोवा खंडपिठाला सुपुर्द केला आहे. या अहवालावर समाधानी नसल्यास गोवा खंडपीठ १५ मे या दिवशी राज्याच्या कोरोना व्यवस्थापनावर पुन्हा सुनावणी घेणार आहे अन्यथा ही सुनावणी नेहमीप्रमाणे सोमवार, १७ मे या दिवशी होणार आहे.

राज्याचे आरोग्य खात्याचे सचिव रवि धवन यांनी गोमेकॉ आणि राज्यातील इतर रुग्णालये येथे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासंबंधी उभारलेल्या उपाययोजनांविषयी पुढील माहिती गोवा खंडपिठाला दिली आहे.

१. गोमेकॉत १३ मेच्या रात्री १० ते सकाळी ५.४५ वाजेपर्यंत मी आणि सचिव डॉ. तारीक थॉमस दोघेही स्थितीवर निरीक्षण ठेवण्यासाठी उपस्थित होतो. या वेळेत आम्हाला ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची एकही तक्रार आली नाही.

२. १३ मे या दिवशी सकाळी ८ ते १४ मे या दिवशी सकाळी ८ या वेळेत गोमेकॉत ६२ ऑक्सिजन ट्रॉलींचा पुरवठा करण्यात आला. या व्यतिरिक्त ६०० जंबो सिलिंडर आणि ४७ लहान सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला.

३. डॉक्टरांच्या मागणीनुसार ३२३ ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरपैकी गोमेकॉला २६३, आयडी रुग्णालयाला (फोंडा) ३०, आझिलोला (म्हापसा) २० आणि केशव सेवा केंद्र (डिचोली) यांना १० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर पुरवण्यात आले.

४. केंद्रशासनाने गोव्यासाठी ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन’च्या (‘एल्.एम्.ओ.’च्या) प्रतिदिन पुरवठयात १३ मेपासून वाढ केली आहे. केंद्राकडून गोव्याला आता ४६ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे, तर पूर्वी २६ मेट्रीक टन पुरवठा होत होता.

५. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने कोल्हापूर येथून ८ प्रशिक्षित आणि अनुभवी ट्रॅक्टरचालक गोव्यात आणले आहेत. याचसमवेत २ अधिक क्षमतेचे ट्रॅक्टरही आणण्यात आले आहेत.

६. घरी अलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनाबाधित रुग्णांना साहाय्य करणार्‍या अशासकीय संस्था यांना ऑक्सिजन सिलिंडर रिफिलींगची सुविधा २४ घंटे उपलब्ध करण्यात आली आहे.

७. मेसर्स स्कूप ऑक्सिजनकडून आणलेले २ डुरा सिलिंडर १३ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता गोमेकाँत नवीन सुविधा असलेल्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत.

दिवसभरात ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

पणजी – गोव्यात १४ मे या दिवशी ६१ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ६ सहस्र ७६९ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २ सहस्र ४५५ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३६.२७ टक्के आहे. दिवसभरात २ सहस्र ९६० रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १५३ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून

३२ सहस्र ३८७ झाली आहे