ऑक्सिजनवर विविधांगी संशोधन करणारे प्रा. भालचंद्र काकडे यांचे चेन्नई येथे ऑक्सिजन अभावी निधन

प्रा. भालचंद्र काकडे

कोल्हापूर, ७ मे – रसायनशास्त्रातील उच्चपदवी घेऊन ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपूरक ऊर्जा निर्माण करून त्याद्वारे रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन करणारे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असणारे प्रा. भालचंद्र काकडे (वय ४४ वर्षे) यांचे चेन्नई येथील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी निधन झाले.

डॉ. काकडे हे चेन्नई येथील ‘एस्.आर्.एम्. रिसर्च इन्सिट्यूट’मध्ये कार्यरत होते. तेथील प्रयोगशाळेत काही कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. यात ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांना शासकीय कोरोना रुग्णालयात भरती करण्यात आले. येथे त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी धडपडत होते; मात्र अखेरच्या क्षणी त्यांना ऑक्सिजन मिळू शकला नाही आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.