राज्यांतर्गत २३ विशेष रेल्वेगाड्या रहित करण्याच्या निर्णयाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ !

मुंबई – राज्याच्या अंतर्गत प्रवास करतांना ‘आर्टीपीसीआर’ ही कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक आहे, तसेच काही ठिकाणी जिल्हा बंदीही आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अंतर्गत प्रवास करणार्‍यांची संख्या न्यून झाली आहे. त्यामुळे राज्याच्या अंतर्गत २३ विशेष गाड्यांच्या फेर्‍या रहित करण्याच्या निर्णयाला मध्य रेल्वेने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

यापूर्वी १० मेपर्यंत या गाड्या रहित ठेवण्यात आल्या होत्या. रहित करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर, पुणे, मनमाड, अमरावती, सोलापूर, नागपूर, लातूर, जालना या गाड्यांच्या फेर्‍या रहित करण्यात आल्या आहेत. यासह दादर-पंढरपूर, दादर-साईनगर शिर्डी, लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम एक्सप्रेस या गाड्याही रहित करण्यात आल्या आहेत. अन्य राज्यांतील प्रवाशांची गर्दी न्यून व्हावी, यासाठी मुंबई-गोरखपूर आणि पुणे-हटिया या विशेष अतीजलद रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत.