ऊसाचे पैसे द्या अन्यथा कारखान्यांसमोर पीपीई किट घालून आंदोलन करणार ! – रयत क्रांती संघटनेची चेतावणी

सातारा – कारखान्यांना ऊस घातल्यानंतर १४ दिवसांत ऊसाचे देयक देणे एफ्.आर्.पी. कायद्यानुसार बंधनकारक आहे; मात्र जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी कोरोनाचे कारण देत ४ मासांपासून शेतकर्‍यांची देयके थकवली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकर्‍यांच्या ऊसाची थकित देयके दिली नाहीत, तर कारखान्यांसमोर पीपीई किट घालून आंदोलन करू, अशी चेतावणी रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी दिली आहे.

साबळे यांनी म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील किसन वीर, शरयू, जरंडेश्‍वर, स्वराज यांसह अनेक साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची देयके थकवली आहेत. शेतकर्‍यांना ऊस उत्पन्नाविना दुसरे साधन नाही. काहींनी बियाणांसाठी, कामगारांसाठी आणि घरखर्चासाठी कर्जे काढली आहेत. कर्जांच्या परतफेडीसाठी अधिकोष तगादा लावत आहेत. कारखान्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेली यंत्रणा चिरीमिरी मिळत असल्यामुळे मूग गिळून गप्प आहे. कारखान्यांनी २ दिवसांमध्ये शेतकर्‍यांची थकित देणी द्यावीत, अन्यथा कारखान्यांसमोर सामाजिक अंतर राखत पीपीई किट घालून आंदोलन करण्यात येईल.