औंध येथील वृद्ध दांपत्याला लुटणारी टोळी कह्यात !

वृद्ध दांपत्याला लुटण्याचे प्रकार सध्या वारंवार होत आहेत. लुटणार्‍या टोळीला कह्यात घेतल्यावर त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. तरच परत अशा प्रकारचा गुन्हा करण्यास कुणी धजावणार नाही !

पुणे – औंध परिसरातील सिंध सोसायटीच्या बंगल्यात घुसून वृद्ध दांपत्याला लुटणार्‍या टोळीला कह्यात घेण्यात आले आहे. या दांपत्याकडे नर्सिंग ब्युरोकडून पूर्वी केअरटेकर म्हणून काम करणार्‍यानेच हा गुन्हा केला असल्याचे समोर आले आहे. संदीप हांडे (वय २५), मंगेश गुंडे (वय २०,) राहुल बावणे (वय २२), विक्रम थापा (वय १९), कृष्णा चव्हाण (वय २५) आणि किशोर चनघटे (वय २१) अशी कह्यात घेतलेल्यांची नावे आहेत. यातील मुख्य सूत्रधार हांडे असून त्याने गुंडे आणि बावणे यांच्या साहाय्याने सिंध सोसायटीतील दांपत्याला लुटले आहे. असाच प्रकारचा गुन्हा त्याने बाणेर परिसरात केल्याचेही समोर आले आहे. या आरोपींकडून १७ लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे.