आझमगड (उत्तरप्रदेश) येथील शवविच्छेदनगृहातच ४ दिवस पडून राहिलेला मृतदेह उंदरांनी खाल्ला !

याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

आझमगड (उत्तरप्रदेश) – राज्याच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृतदेह ४ दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच पडून होता. हा मृतदेह सडला होता, तसेच उंदीर आणि मुंग्या यांनी मृतदेहाचा काही भाग खाल्ला असल्याची घटना समोर आली आहे. महिलेचा मृतदेह सडल्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरला होता. त्यामुळेच ही घटना उघडकीस आली. यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

२९ एप्रिलला संध्याकाळी बिलरियागंजमध्ये रस्त्यावर एक ३२ वर्षीय महिला घायाळ अवस्थेत आढळली होती. तिला रुग्णवाहिकेच्या कर्मचार्‍यांनी संध्याकाळी ५ वाजता रुग्णालयात भरती केले; मात्र दुसर्‍याच दिवशी सकाळी तिचा मृत्यू झाला. यानंतर कर्मचार्‍यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवला. याविषयी पोलिसांनाही माहिती दिली; मात्र नंतर कुणीच त्याकडे लक्ष दिले नाही. मृतदेह तसाच पडून राहिल्याने उंदरांनी त्याचा काही भाग खाल्ला.