एक वर्षातील ३६६ आमदारांचा निधी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी व्यय (खर्च) करा !

माजी आमदार अमर काळे यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी आमदार अमर काळे 

वर्धा – राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद यांतील ३६६ आमदारांचा १ वर्षाचा संपूर्ण स्थानिक विकासनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यय (खर्च) करावा, अशी मागणी येथील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २८ एप्रिल या दिवशी एका पत्राद्वारे केली आहे. आमदारांच्या निधीतून जवळपास १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद होऊ शकेल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

अमर काळे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, कोरोनाच्या भीषण परिस्थितीत आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. या गंभीर परिस्थितीला आरोग्य विभाग सामर्थ्याने लढा देत असला, तरी रुग्णांना वैद्यकीय सेवा देतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांचा कर्मचारी वर्ग, औषध साठा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि खाट हे वाढत्या रुग्णसंख्येपुढे अल्प पडत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग सक्षम करणे आवश्यक आहे.’’