नागपूर – केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई येथील निवासस्थानासह राज्यातील १० ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे देशमुख यांच्या येथील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. देशमुख हे सध्या येथेच मुक्कामी आहेत. येथील निवासस्थानीही सीबीआयचे पथक चौकशी करत आहे. देशमुख यांच्या निवासस्थानी असलेल्या एका कर्मचार्याने ‘अनिल देशमुख २४ एप्रिल या दिवशी सकाळी ते फिरायला गेले होते’, असे प्रसारमाध्यमांना सांगितले. देशमुख यांच्या निवासस्थानी बंदोबस्तावर असलेल्या सीताबर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्यांना विचारले असता त्यांनाही याविषयी माहिती नव्हती; मात्र पीपीई कीट घालून काही जण देशमुख यांच्या निवासस्थानाच्या आत असल्याचे दिसत होते.
नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सीबीआयच्या विरोधात आंदोलन !
नागपूर – केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने)माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी धाडी टाकल्याच्या निषेधार्थ २४ एप्रिल या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. या वेळी त्यांनी केंद्र सरकार, भाजप आणि सीबीआय यांचा धिक्कार केला. संचारबंदी आणि जमावबंदी असल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.
कायद्यापेक्षा कुणी मोठे नाही, अनिल देशमुख यांना अटक केली पाहिजे ! – अधिवक्त्या जयश्री पाटील
धाड टाकल्याविषयी अधिवक्त्या जयश्री पाटील म्हणाल्या, ‘‘अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची वसुली काही उद्योगवाल्यांकडून चालू केली होती. त्यांना अटक झाली पाहिजे. अनिल देशमुख यांना मी घाबरणार नाही. त्यांच्यावर खासदार शरद पवार यांचा कितीही मोठा आशीर्वाद असला, तरी कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. देशमुख यांनी कितीही शक्ती आणि पैसा लावला, तरी कायदा तुमच्यासमोर झुकणारा नाही, हे सिद्ध झालेले आहे. देशमुख यांच्यावरील कारवाई हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे. हा राज्यघटना आणि न्यायव्यवस्था यांचा मोठा विजय आहे.’’