चेन्नई येथील साधिका सौ. गीतालक्ष्मी यांना रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यात आलेल्या अनुभूती

सनातन आश्रम, रामनाथी

१. रामनाथी आश्रमात जीवनाचा खरा अर्थ अनुभवता येणे

‘रामनाथी आश्रमात आल्यावर आम्हाला आश्रम दाखवण्याची सेवा करणार्‍या आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांचे मनःपूर्वक आभार ! आश्रमाची माहिती सांगतांना त्यांनी एक विधान केले, ‘हा आश्रम म्हणजे केवळ इमारत नसून ती एक ‘लिव्हींग प्लेस आहे.’ यातील ‘लिव्हींग’चा अर्थ ‘रहाण्याची जागा’ नसून ‘येथे जीवनाचा खरा अर्थ कळत असून तुम्ही तो अनुभवू शकता’, असे हे स्थान आहे. मला तो अर्थ माझ्या आश्रमातील वास्तव्यात अनुभवता आला.

२. आश्रमातील ध्यानमंदिर आणि प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीतच नव्हे, तर अनेक ठिकाणी चैतन्याची अनुभूती येणे

त्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर आम्ही ध्यानमंदिरात काही काळ नामजप करत बसलो होतो. आश्रमातील ध्यानमंदिरात दैवी चैतन्याचा अनुभव येतो. हे प्रत्येकाला त्वरित मान्य होण्यासारखे आहे; परंतु येथील भोजनकक्ष, जिने, मार्गिका आणि लागवड येथेही चैतन्याची अनुभूती येते. प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत गेल्यावर तेथील कपाटे, पडदे, पलंग, स्नानगृह आणि शौचालय या वस्तूंकडे पाहिल्यावर माझ्या मनात पहिला विचार हाच होता की, निर्जीव वस्तूंमध्ये जिवंतपणा कसा असू शकतो ? उपायांच्या खोलीतील स्नानगृहात उपायांसाठी बसलेल्या साधकांना पाहून ‘ते येथे कसे काय बसू शकतात ? यांना वेड तर लागले नाही ना ?’, असा विचार माझ्या मनात आला; पण त्याच दिवशी ‘मी किती अयोग्य विचार करत आहे’, हे माझ्या लक्षात आले; कारण त्या खोलीतही तितक्याच प्रमाणात चैतन्याची अनुभूती येते.

३. प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत नामजप करतांना शरीर आणि मन यांची शुद्धी होणे अन् हाताच्या कोपरापाशी वेदना होऊन उपाय औषधाचे कार्य करत असून तेथील वेदना नष्ट करत असल्याचे जाणवणे

​एरव्ही नामजप करतांना मी ‘मानसपूजा करत आहे’, असा भाव ठेवते. काही वेळा काही दृश्येही माझ्या डोळ्यांसमोरून तरळून जातात. या वेळीही मी मुनीश्‍वराच्या चरणांवर फुले अर्पण करत असल्याचे दृश्य दिसले. नंतर श्रीकृष्णाचे एक सुंदर रूप आणि नंतर मला एक सर्प दिसला. (मला पुष्कळदा असा सर्प दिसतो.) यानंतर मला उपायांच्या खोलीत नामजपाला बसावे, अशी तीव्र इच्छा माझ्या मनात आली. तिथे नामजप करत असतांना माझे शरीर आणि मन यांची शुद्धी होऊ लागली. पहिल्यांदा माझ्या हाताच्या कोपरापाशी वेदना होऊ लागल्या. पूर्वी काही शारीरिक आजारांसाठी औषधे घेत असतांना मला असेच दुखत असे. असे दुखणे म्हणजे औषध लागू पडत असल्याचे लक्षण होते. सध्या मी कोणतेही औषध घेत नसूनही मला अशाच वेदना होत होत्या. उपायांची खोली माझ्यासाठी औषधाचे कार्य करत होती. ‘माझ्या शरिरात जे काही वेदनाकारक शिल्लक आहे, ते काढून टाकण्याचे कार्य ही उपायांची खोली करत आहे’, असा विचार माझ्या मनात आला.

४. सजीव आणि निर्जीव वस्तूंतही ईश्‍वर अन् त्याची शक्ती प्रकट होऊ शकत असल्याचे अनुभवणे आणि त्यानंतर हलके वाटून स्वतः आनंदाने वेढले असल्याचे जाणवणे

​‘सजीव आणि निर्जीव दोन्ही वस्तूंतही ईश्‍वर अन् त्याची शक्ती प्रकट होऊ शकते’, हेच मला यातून शिकायला मिळाले. उपायांच्या खोलीतून अर्ध्या घंट्याने आम्ही सर्व बाहेर आलो. ‘उपायांच्या खोलीत बसावे’, असे मला आतून वाटत होते; म्हणून मी तेथे उपायांना बसले. तिथे मला पुष्कळ चांगले वाटत होते. काही वेळाने मला काही कारण नसतांना आनंद जाणवू लागला, तसेच मला हलके वाटू लागले. ‘मी आनंदाने वेढली गेली आहे’, असे जाणवत होते. मला चांगले वाटत होते. ‘तेथून बाहेर पडूच नये’, असे मला वाटत होते; परंतु उपायांच्या खोलीत बसण्याची वेळ संपली होती.

५. खोलीबाहेरच्या झोपाळ्यावर बसल्यावर तिथेही आनंद जाणवणे आणि ‘आश्रमाच्या परिसरात अन् संपूर्ण विश्‍वात हा आनंद भरला आहे’, असे जाणवणे

जिन्यावरून वर गेल्यावर मला एक झोपाळा दिसला. मी झोपाळ्यावर बसले. उपायांच्या खोलीत बसल्यावर जाणवणारा आंतरिक आनंद मला इथेही जाणवत होता. ‘माझ्या सभोवताली, आश्रमात, आश्रमाच्या सभोवतालच्या परिसरात आणि संपूर्ण विश्‍वात हा आनंद भरला आहे’, असे मला जाणवत होते. ‘हे श्रीकृष्णा, मला हे काय होत आहे ? मला इतका का आनंद होत आहे ? हे सर्व ईश्‍वरमय आहे का ? हे गुरुतत्त्व आहे का ? तू इथे माझ्या आसपास आहेस का ? आणि त्यामुळेच मला आनंद जाणवत आहे का ? तू माझ्या जवळ आहेस, तर मी तुला का पाहू शकत नाही ? कृष्णा, मी तुला माझ्या डोळ्यांनी पाहू शकेन का ?’, असे विचार येऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

६. खिडकीत प.पू. डॉक्टरांचे दर्शन होणे

त्यानंतर माझी दृष्टी वर विरुद्ध दिशेला गेली. मला खिडकीत प.पू. डॉक्टरांचा तोंडवळा दिसला. त्यांचे डोळे आणि नाक मला अगदी स्पष्टपणे दिसत होते. मी जे पहात आहे, त्यावर माझा विश्‍वास बसत नव्हता; परंतु ते सत्य होते. दुसर्‍या दिवशी मी ही अनुभूती सौ. सुगंधीअक्कांना सांगितली. मी जे आदल्या दिवशी पाहिले, ते त्यांनाही दिसत आहे का ? याविषयी त्यांना विचारल्यावर त्यांनाही तेथे प.पू. डॉक्टरांचे दर्शन होत असल्याचे त्यांनी मला सांगितले.
​मला आलेल्या या अनुभूतींविषयी श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. गीतालक्ष्मी, चेन्नई. (३०.६.२०१६)