गोव्यात कोरोनाबाधित २१ रुग्णांचा मृत्यू

दिवसभरात १ सहस्र ४१० नवीन रुग्ण

पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) – राज्यात २२ एप्रिलला कोरोनाबाधित २१ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ९६४ झाली आहे. २२ एप्रिल या दिवशी मृत झालेल्यांपैकी ४ रुग्ण ५० वर्षांखालील आहेत, तसेच ३ रुग्णांना मृतावस्थेतच रुग्णालयात आणण्यात आले होते.

राज्यात २२ एप्रिलला कोरोनाबाधित १ सहस्र ४१० नवीन रुग्ण सापडले. एकाच दिवशी कोरोनाविषयक ३ सहस्र ९०६ चाचण्या करण्यात आल्या आणि चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण

३६ टक्के आहे. प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० सहस्र २२८ झाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण अधिक प्रमाणात पुढील आरोग्य केंद्रांमध्ये आहेत. मडगाव १ सहस्र १३४, पर्वरी ८८७, कांदोळी ८८५, पणजी ६८३, वास्को ६३३, फोंडा ६००, कुठ्ठाळी ५६०, म्हापसा ५४६, चिंबल ३४६, कासावली ३१४, सांखळी २७९, शिवोली २४४, पेडणे २२६, डिचोली २१९, हळदोणा २०५. दिवसभरात ४६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोना महामारीशी संबंधित राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत उपस्थिती लावणे केले बंधनकारक ! – शिक्षण खात्याचे परिपत्रक

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण खात्याने राज्यातील खात्यांतर्गत येणारे सर्व प्रत्यक्ष वर्ग ३० एप्रिलपर्यंत रहित केले आहेत; परंतु शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून शाळेमध्ये उपस्थित रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण खात्याने २२ एप्रिल या दिवशी या अनुषंगाने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी ‘ऑनलाईन’ वर्ग घ्यावेत, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

राज्यात केवळ ३० प्लाझ्मा : ‘प्लाझ्मा दाना’साठी नागरिकांनी पुढे यावे ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

राज्यात केवळ ३० रुग्णांपुरता प्लाझ्माचा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्रतिदिन राज्यात ७ ते ८ रुग्णांना प्लाझ्माची आवश्यकता भासते. राज्यात कोरोनाची चाचणी करण्यासाठी फिरते वाहन उपलब्ध करण्यात आले आहे आणि यामध्ये प्रतिदिन ९०० चाचण्या करण्यात येत आहेत. चाचणी करण्यासाठी येणार्‍या प्रत्येकी ३ मधील १ व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

१८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांना कोरोनाची लस विनामूल्य देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत

राज्यशासन कोरोना लसीचे ५ लाख डोस थेट ‘सीरम इन्स्टिट्यूट’ या निर्मात्या आस्थापनाकडून विकत घेणार आहे. शासन ६० कोटी रुपये खर्च करून एकूण १५ लाखांहून अधिक कोरोनाचे डोस विकत घेणार आहे. राज्यातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांना कोरोनाची लस विनामूल्य दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

शासकीय कार्यालये निम्म्या क्षमतेने कार्यरत रहाणार

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यशासनाने सर्व शासकीय खात्यांच्या प्रमुखांना कार्यालये निम्म्या क्षमतेने चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस, होम गार्ड, सिव्हील डिफेन्स, अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन, कारागृह प्रशासन, जिल्हा प्रशासन, वन खाते आणि पालिकेची सेवा यांना या निर्देशातून वगळण्यात आले आहे. शासकीय कर्मचार्‍यांना एक दिवसाआड कामावर उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे. हे निर्बंध ३० एप्रिलपर्यत असतील.

मतदान प्रक्रिया चालू असतांना पालिका क्षेत्रांमध्ये लसीकरण मोहीम चालू ठेवण्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

राज्यातील मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे आणि केपे नगरपालिकांसाठी २३ एप्रिलला निवडणूक होत आहे. या पालिका क्षेत्रांत येणार्‍या सर्व कोरोना लसीकरण केंद्रांमध्ये २३ एप्रिलला लसीकरण मोहीम चालू ठेवण्यास राज्य निवडणूक आयोग्याने मान्यता दिली आहे. प्रारंभी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केवळ २१ एप्रिलपर्यंत कोरोना लसीकरणाला अनुमती दिली होती. आरोग्य खात्याने केलेल्या विनंतीवरून राज्य निवडणूक आयोगाने आता २३ एप्रिलला लसीकरणास मान्यता दिली आहे; मात्र लसीकरण मोहीम ही कोणताही उमेदवार किंवा पक्ष यांच्या हितासाठी राबवली जाऊ नये, अशी चेतावणी राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.