|
पणजी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – नोकरी विक्री घोटाळा हा गेल्या १० वर्षांपासून चालू आहे. हा घोटाळा कित्येक कोटींचा आहे. आतापर्यंत राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मिळून ३९ लोकांच्या विरोधात २९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर ३३ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. आणखी काही संशयित पसार असून त्यांचा शोध चालू आहे. या घोटाळ्यात एकूण ९४ जणांची फसवणूक झाली आहे. या घोटाळ्याच्या अन्वेषणावर मी आणि पोलीस महानिरीक्षक देखरेख ठेवून आहोत. या घोटाळ्याचे अन्वेषण योग्य रितीने चालू असल्याने यासाठी निराळे विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याची आवश्यकता नाही. संशयितांनी पैसे घेऊन सरकारी नोकरी दिल्याचा पुरावा नाही. या घोटाळ्यात राजकीय लागेबांधे नाहीत. राजकारण्यांची नावे कुणी घेत असेल, तर ती लोकांची फसवणूक करण्यासाठीच घेतली असावी, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी येथील पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी घोटाळ्यासंबंधी सविस्तर माहिती दिली.
दक्षिण गोव्यात २ सरकारी कर्मचार्यांसह एकूण २१ जण कह्यात
या वेळी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत म्हणाल्या, ‘‘नोकरी विक्री घोटाळ्यामध्ये आतापर्यंत दक्षिण गोव्यात २ सरकारी कर्मचार्यांसह २१ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. या अंतर्गत वर्ष २०१५ पासून एकूण ५० जणांची फसवणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक प्रकरणे नोंदवण्यात आलेली आहेत आणि एकूण ५ कोटी रुपये किमतीच्या विविध वस्तू अन् वाहने कह्यात घेण्यात आली आहेत, तर अधिकोषातील खाती गोठवण्यात आली आहेत. आतापर्यंत एकाही घोटाळ्यात राजकीय संबंध असल्याचे उघडकीस आलेले नाही.’’
उत्तर गोव्यात नोकरी विक्री घोटाळ्याची १७ प्रकरणे
या वेळी उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल म्हणाले, ‘‘उत्तर गोव्यात नोकरी विक्री घोटाळ्याची आतापर्यंत एकूण १७ प्रकरणे नोंद झालेली आहेत आणि एकूण १३ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. काही आरोपींवर अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत. ११६ ग्रॅम सोने कह्यात घेण्यात आले आहे.’’
आमदार गणेश गावकर यांचे अन्वेषण चालू
दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सावंत म्हणाल्या, ‘‘नोकरी विक्री घोटाळ्याच्या प्रकरणी आमदार गणेश गावकर यांचे अन्वेषण चालू आहे. या विषयी तक्रारदाराकडून आणखी काही माहिती मागितली आहे.’’
फोंडा न्यायालयाकडून दीपश्री सावंत हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
फोंडा प्रथमश्रेणी न्यायालयाने घोटाळ्यासंबंधीच्या एका प्रकरणातील संशयित दीपश्री सावंत हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तसेच श्रुती प्रभुगावकर हिला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोलवाळ पोलिसांनी रिवारा येथील एका व्यक्तीची सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून ४ लाख रुपये उकळल्याच्या प्रकरणी संशयित उमा पाटील (रहाणार्या बायणा, वास्को) यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला आहे.
नोकरी विक्री घोटाळ्यावर आगामी मंत्रीमंडळ बैठकीत होणार चर्चा ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर
पणजी – आगामी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नोकरी विक्री घोटाळ्याच्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. या घोटाळ्यामुळे आमदारांच्या प्रतिमेला तडा जात आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नोकरी विक्री घोटाळ्याच्या प्रकरणी पत्रकारांशी बोलतांना दिली. याविषयी वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो म्हणाले, ‘‘नोकरी विक्री घोटाळ्याच्या प्रकरणी पोलीस तपास योग्य दिशेने चालू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.’’