कोरोना महामारी संपवण्‍यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करा ! – श्रीराम सेना कर्नाटक (बेळगाव विभाग)

बेळगाव – या वर्षी शेकडो वर्षांचा संघर्ष आणि लाखो हिंदूंचे बलीदान यानंतर अयोध्‍या येथील रामजन्‍मभूमीवर श्रीराम मंदिर साकारण्‍यास प्रारंभ झाला आहे. हा आनंद आणि उत्‍साह शब्‍दात सांगता येणारा नाही. दुसरीकडे गेल्‍या दीड वर्षापासून कोरोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे आणि सध्‍या दुसर्‍या लाटेने भारतात थैमान घातले आहे. त्‍यामुळे यंदा श्रीरामनवमी उत्‍सवावर निर्बंध येण्‍याची दाट शक्‍यता आहे. तरी कोरोना महामारी संपवण्‍यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करा, असे आवाहन श्रीराम सेना कर्नाटक यांच्‍या बेळगाव विभागाच्‍या वतीने काढलेल्‍या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या पत्रकात पुढे म्‍हटले आहे की,

१. रामनवमीच्‍या दिवशी (२१ एप्रिल) हिंदूंनी त्‍यांच्‍या घरावर भगवा ध्‍वज लावला आणि घरासमोर रांगोळी काढावी.
२. प्रत्‍येकाने त्‍यांच्‍या घरी श्रीरामाच्‍या प्रतिमेचे पूजन, भजन आणि आरती करावी.
३. सर्वांनी श्री रामरक्षा स्‍तोत्र वाचावे आणि दिवसभर ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा जप करावा.
४. घरात पुरणपोळी, गोडधोड करून श्रीरामाला नेवैद्य अर्पण करावा.
५. गोशाळेला साहाय्‍य करावे.