‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. ११.४.२०२१ ते १७.४.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, शिशिरऋतू, फाल्गुन मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. १३.४.२०२१ पासून ‘प्लव’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, वसंत ऋतू, चैत्र मास आणि शुक्ल पक्ष चालू होणार आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. दर्श अमावास्या : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे ‘दर्श’ संज्ञक मानतात. रविवार, ११.४.२०२१ या दिवशी पहाटे ६.०४ पासून १२.४.२०२१ या दिवशी सकाळी ८.०१ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे.
२ आ. मन्वादि : फाल्गुन अमावास्या तिथी आणि चैत्र शुक्ल तृतीया तिथीला ‘मन्वादि योग’ होतो. ११.४.२०२१ आणि १५.४.२०२१ या दिवशी मन्वादि योग आहे. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.
२ इ. सोमवती अमावास्या : सोमवारी अमावास्या तिथी आल्यास ‘सोमवती योग’ होतो. या योगावर तीर्थस्नान, अश्वत्थपूजन, विष्णुपूजन करावे. सोमवारी १२.४.२०२१ या दिवशी ‘सोमवती अमावास्या’ आहे.
२ ई. कल्पादि : चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा आणि चैत्र शुक्ल पंचमी तिथीला ‘कल्पादि योग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे. १२.४.२०२१ या दिवशी सकाळी ८.०१ नंतर चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी आणि १७.४.२०२१ या दिवशी चैत्र शुक्ल पंचमी तिथी आहे.
२ उ. गुढीपाडवा, संवत्सरारंभ, वासंतिक देवी नवरात्रारंभ : शालिवाहन शक वर्षाचा प्रारंभ चैत्र मासापासून होतो. १३.४.२०२१ या दिवशी शालिवाहन शक वर्ष १९४३ आणि ‘प्लव’ नाम संवत्सर चालू होणार आहे. वसंत ऋतूचा आरंभसुद्धा चैत्र मासापासून होतो. चैत्र मासात पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्राच्या जवळ असल्याने या मराठी मासाचे नाव ‘चैत्र’ आहे. या दिवशी अभ्यंगस्नान करून गुढी पूजन करतात. पंचांगस्थ गणपति पूजन, वत्सराधिपती (ग्रह) पूजन करतात. या वर्षी वत्सराधिपती ‘भौम’ (मंगळ) ग्रह आहे. या दिवशी कडूलिंबाचा प्रसाद ग्रहण करतात. चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून संवत्सरारंभ, बालचंद्रमा व्रत, वासंतिकदेवी नवरात्रारंभ, श्रीराम नवरात्रारंभ चालू होते; परंतु यासाठी प्रतिपदा सूर्योदयव्यापिनी हवी. १२.४.२०२१ या दिवशी सकाळी ८.०१ नंतर चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा ही तिथी चालू होते; परंतु १३.४.२०२१ या दिवशी सकाळी १०.१७ पर्यंत चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी सूर्योदयव्यापिनी आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आहे; परंतु या दिवशी उपनयन (मुंज), विवाह, तसेच वास्तुशांती यांचे मुहूर्त शास्त्रानुसार करता येत नाहीत. लौकिक गृहप्रवेश, साखरपुडा, जावळ, खरेदी-विक्री व्यवसायाचा शुभारंभ इत्यादी गोष्टी करता येतात.
२ ऊ. अमृत योग : अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. १३.४.२०२१ या दिवशी हा योग दुपारी २.१९ पर्यंत आहे.
२ ए. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे ‘चंद्रकोर’ रूपात प्रथम दर्शन होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. १३.४.२०२१ या दिवशी सायंकाळी ८.०६ पर्यंत चंद्रदर्शन आहे.
२ ऐ. हरिद्वार कुंभपर्व प्रारंभ : १३.४.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.३२ मिनिटांनंतर रवि ग्रहाचा मेष राशीत प्रवेश झाल्यावर, म्हणजे १४.४.२०२१ या दिवसापासून हरिद्वार कुंभपर्वाला प्रारंभ होणार आहे. या दिवशी शंकर-पार्वतीस दवणा वहातात. हा कुंभमेळा १४.४.२०२१ पासून १४.५.२०२१ पर्यंत आहे.
२ ओ. गौरी तृतीया (तीज) : सूर्योदयव्यापिनी चैत्र शुक्ल तृतीया तिथीला गौरी तृतीयेचे पूजन करतात. १५.४.२०२१ या दिवशी चैत्र शुक्ल तृतीया तिथी आहे. या दिवशी गौरी शंकराचा एक मास दोलोत्सव साजरा करतात. गौरी शंकराला एक मास पाळण्यात ठेवले जाते. स्नान, अभिषेक पूजा इत्यादीसाठी पाळण्यातून बाहेर काढले जाते. काही कारणांमुळे या दिवशी गौरी शंकराचे पूजन करता आले नाही, तर चैत्र कृष्ण तृतीया (दुसरी तीज) या दिवशी करावे. या निमित्ताने महिन्यात कधीही आपल्या सोयीनुसार अक्षय तृतीयेपर्यंत हळदी-कुंकू करतात. अक्षय तृतीयेच्या दुसर्या दिवशी गौरी शंकर पाळण्यातून काढून नेहमीप्रमाणे सर्व देवतांबरोबर ठेवावेत. चैत्र शुक्ल तृतीया तिथीला ‘श्रीराम दोलोत्सव’, ‘सौभाग्य शयनव्रत’ आणि ‘मत्स्य जयंती’ साजरी केली जाते.
२ औ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १५.४.२०२१ या दिवशी उत्तररात्री ४.४८ पासून १६.४.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.०६ पर्यंत विष्टी करण आहे.
२ अं. यमघंट : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने ‘यमघंट योग’ होतो. १५.४.२०२१ या दिवशी सूर्योदयापासून रात्री ८.३२ पर्यंत कृत्तिका नक्षत्र आणि गुरुवार एकत्र आल्याने अन् १६.४.२०२१ या दिवशी सूर्योदयापासून रात्री ११.४० पर्यंत रोहिणी नक्षत्र आणि शुक्रवार एकत्र आल्याने ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. या योगावर कधीही प्रवास करू नये.
२ क. विनायक चतुर्थी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ‘विनायक चतुर्थी’ म्हणतात. या दिवशी श्री विनायक (गणेश) व्रत करतात. या दिवशी श्री विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा आणि श्री विनायक अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात. चैत्र शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीला दवणा आणि लाडूचा नैवेद्य समर्पित करतात.
२ ख. शुक्र पश्चिम दर्शन : २१.२.२०२१ पासून १६.४.२०२१ पर्यंत शुक्र ग्रहाचा अस्त होता. सूर्य सान्निध्यामुळे मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे ग्रह अस्तंगत होत असतात. १६.४.२०२१ या दिवशी शुक्र ग्रहाचे पश्चिम दिशेला दर्शन होणार आहे.
२ ग. विष्णूचा दोलोत्सव आणि हयव्रत : चैत्र शुक्ल तृतीया तिथीला ‘श्री विष्णूचा दोलोत्सव’ आणि ‘हयव्रत’ करतात.
२ घ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १७.४.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.३३ पासून १८.४.२०२१ या दिवशी रात्री १०.३५ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (५.४.२०२१)