‘आज आपल्या देशात इतकी महागाई, भ्रष्टाचार, नक्षलवाद, आतंकवाद, गुन्हेगारी आणि बेकारी बोकाळली आहे की, चारही बाजूंनी लोक त्रस्त आहेत. सरकार मात्र सुस्त आहे. वर्षानुवर्षे हे चालूच आहे. भ्रष्टाचार, महागाई वगैरे न्यून नाही, तर उलट वाढतच चालली आहे. दुसरीकडे नेते, उद्योगपती ऐषोआरामात जगत आहेत. आज राबराब राबणारा उपाशी आणि कुपोषित जीवन जगत आहे. सामान्य माणसाचे जीवन जगणे हराम झाले आहे. आपण निवडलेले नेते काय करत आहेत ? हे जाणून घ्यायची इच्छाच नाही. ते ‘सत्तेतून पैसा-पैशातून सत्ता’ याप्रमाणे वागतात.
यातूनच मग भ्रष्टाचार बोकाळतो. सामान्य माणूस भरडला जातो, म्हणजेच सामान्य माणूसच या परिस्थितीला ‘मीच उत्तरदायी आहे’, असे म्हणायला काहीच हरकत नाही. आतापर्यंत सत्ता भोगणारे भोगतच राहिले, मी मात्र आहे तिथेच आहे. मी सोसतोय महागाईचे चटके आणि नेते जीवन जगतात नेटके ! इथून पुढे तरी असे व्हायला नको. याचा सर्वसामान्य जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे.’
– श्री. सखाराम एकशिंगे (केनवडेकर), गोरंबे, कागल, कोल्हापूर.