नगर, ५ एप्रिल – महाराष्ट्राची लोककला असलेल्या वारली चित्रकलेत रामायण रेखाटण्याचा प्रयत्न नगरच्या वारली चित्रकलाकार हर्षदा डोळसे यांनी केला आहे. मागील वर्षी दळणवळण बंदीच्या काळात दूरदर्शनवर ‘रामायण’ या प्रसिद्ध मालिकेचे पुनर्प्रक्षेपण झाले होते. यातून त्यांना वारलीमध्ये रामायण चितारण्याची कल्पना सुचली. रामायणातील प्रमुख प्रसंग कोणते ?, रामायणाचे वैशिष्ट्य काय आदी अभ्यास त्यांनी केला. रामायणातील रामजन्म ते लवकुश जन्म असे प्रमुख १० प्रसंग निवडून एका ‘कॅनव्हास’वर ते वारली कलेतून साकारले. अनेक प्रयत्न केल्यानंतर एका कॅनव्हासवर वारली चित्ररामायण त्यांनी पूर्ण केले. वारलीच्या माध्यमातून हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हर्षदा डोळसे या नगरमधील प्रसिद्ध खडूशिल्पकार, कलाशिक्षक अशोक डोळसे यांच्या पत्नी आहेत. सह्याद्री डोंगररांगांत आणि जंगल परिसरात अधिवास असलेल्या आदिवासी समाजात या चित्रकलेचा जन्म झाला. त्याला ठाणे जिल्ह्यातील वारली चित्रकार जीवा सोमा म्हसे यांनी जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला.