संस्कृती रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी व्हा ! – १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

हरिद्वार, ४ एप्रिल (वार्ता.)  संस्कृति रक्षणाचे कार्य सर्व हिंदूंनी केले पाहिजे. आपली संस्कृती, संस्कार आपण वाचवू शकलो नाही, तर भूमीच्या तुकड्याचे काही मोल रहाणार नाही. त्यामुळे आपली संस्कृती वाचण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी व्हावे, समितीने आयोजित केलेले प्रदर्शन सर्वांनी पहावे, असे आवाहन जुना आखाड्याचे १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या वेळी ते मार्गदर्शन करत होते. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट, मध्यप्रदेश आणि राजस्थानचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच समितीच्या वतीने कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या ‘धर्मशिक्षण फलक’ प्रदर्शनाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. या वेळी समितीचे सर्वश्री हरिकृष्ण शर्मा आणि विनित पाटील हेही उपस्थित होते.

१००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांना कुंभपर्व विशेषांक देतांना समितीचे श्री. सुनील घनवट

या प्रसंगी श्री. सुनील घनवट यांनी १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांना शासनाच्या मंदिर अधिग्रहण कायदा आणि त्याच्या विरुद्ध समितीच्या वतीने देशात ठिकठिकाणी चालू असलेल्या आंदोलनाविषयी सांगितले. समितीच्या कार्याची ही माहिती ऐकून ते प्रभावित झाले. या वेळी १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्‍वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘पाना’ला आपण ‘फॉलो’ करत असल्याचे आवर्जून सांगितले.

अभियानात करण्यात आलेले अन्य संपर्क

  • ‘आचार्य बेला इंडिया टेम्पल’चे श्री. दियांग वेदांती यांनी सांगितले की, मंदिरांचे रक्षण आणि लव्ह जिहादमध्ये बळी पडणार्‍या हिंदू तरुणींचे रक्षण यांसह हिंदु धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदु संघटनांनी एकत्र येऊन समितीसह कार्य केले पाहिजे.
  • वृंदावन येथील श्री जानकी वल्लभ मंदिर येथील कथाकार गोविंददास महाराज यांनी ‘हिंदु संस्कृति पुरातन असल्याचे सांगून आपण आपला धर्म योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे. हिंदू जागृत झाला, तर आपला धर्म, संस्कृती आणि हिंदुस्थानही वाचू शकणार आहे’, असे म्हटले.