- वेगवेगळ्या राज्यांत केलेले २९ गुन्हे उघड
- १०० ते १५० बँक खात्यांचा वापर

पुणे – ‘नॅशनल सायबर क्राइम पोर्टल’वर वेगवेगळ्या राज्यांत २९ सायबर गुन्हे नोंद असलेल्या टोळीला पुणे पोलिसांनी गजाआड केले. या टोळीने फसवणुकीसाठी १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केला आहे, तसेच या टोळीचे दुबई, बंगाल आणि गुजरात येथील काही जणांशी संबंध असल्याची माहिती पोलीस अन्वेषणात उघड झाली आहे. गोविंद सूर्यवंशी, रोहित कंबोज, बाबाराव उपाख्य ओंकार भवर, जब्बरसिंह पुरोहित, निखिल उपाख्य किशोर सावंत, केतन भिवरे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनन्या गुप्ता असे नाव सांगणार्या महिलेने एका ज्येष्ठाच्या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधला होता. गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाकडून १ लाख ६० सहस्र रुपये घेतले. ज्येष्ठाने आरोपींच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते. त्यापैकी काही रक्कम वाघोलीतील एका बँक खात्यात जमा झाल्याची माहिती अन्वेषणात मिळाली. त्यानंतर संबंधित बँकेतील खातेधारक भिवरे याला कह्यात घेतले. तांत्रिक अन्वेषणात इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली.
संपादकीय भूमिका :एवढ्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे होत असणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावर लवकरात लवकर कठोर उपाययोजना काढणे आवश्यक ! |