असुरक्षित महसूल अधिकारी !
सातारा, ३० मार्च (वार्ता.) – माण तालुक्यातील ढाकणी येथे अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करणारे मंडलाधिकारी शरद सानप आणि सिद्धार्थ जावीर यांना वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली आहे.
माणच्या तहसीलदार बाई माने यांना चोरट्या वाळू वाहतुकीविषयी माहिती मिळाली. त्यांनी याविषयी भरारी पथकाला आदेश देऊन तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार ढाकणी-पानवन रस्त्यावर अनधिकृत वाळू वाहतूक करणार्या वाहनाला मार्डीचे मंडलाधिकारी शरद सानप आणि शिंगणापूरचे मंडलाधिकारी सिद्धार्थ जावीर यांनी पकडले. या वेळी वाळू वाहतूक करणारे राजेंद्र खाडे यांनी भ्रमणभाष करून २० ते २५ जणांना बोलावून घेतले. त्यांनी मंडलाधिकारी सानप आणि जावीर यांना गाडी सोडण्यासाठी लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी राजेंद्र खाडे आणि त्यांचे सहकारी यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाळू माफियांवर कारवाई करण्याची महसूल कर्मचार्यांची मागणी !अशी मागणी महसूल कर्मचार्यांना का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? माण तालुक्यात नरवणे गावात वाळूच्या कारणावरून आठवड्यापूर्वी २ हत्या झाल्या होत्या. त्या मागोमाग ही घटना घडली आहे. अजूनही वाळू माफिया महसूल विभागातील अधिकार्यांना जुमानत नाहीत, असे चित्र पहायला मिळत आहे. वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले असून त्यांना वेळीच वठणीवर आणले पाहिजे. यासाठी शासकीय अधिकार्यांवर सामूहिक जीवघेणा हल्ला करणार्यांना पोलिसांनी पाठीशी न घालता त्यांच्यावर मकोकासारखे गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी महसूल कर्मचारी करू लागले आहेत. |