सातारा, ३० मार्च (वार्ता.) – स्थावर मिळकतीविषयीच्या अभिहस्तांतरण किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत सवलत घोषित केली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील १५ दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून ४ मासांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात. त्यामुळे संबंधित नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन सह जिल्हा निबंधक (वर्ग १) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बी.के. खांडेकर यांनी केले आहे.
मुंबई महसूल आणि वन विभाग यांच्या २९ ऑगस्ट २०२० या दिवशीच्या शासन राजपत्रानुसार कोणत्याही स्थावर मिळकतीविषयी अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या, तसेच २९ वर्षांहून अधिक कालावधीचे भाडेपट्टा या दस्तऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या १ च्या अनुच्छेद २५ च्या खंड (बी) आणि ३६ (४) अन्वये अधिभारासह आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क अल्प केले आहे. १ सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० यासाठी ३ टक्के, तर १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ यासाठी २ टक्के मुद्रांक शुल्क अल्प केले आहे.