विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणे न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन ! – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट 

‘रेहानबाबा’ दर्ग्याला शासकीय खिरापत, तर मंदिरे अन् बाजीप्रभूंचे स्मारक यांकडे शासनाचा कानाडोळा !

विशाळगड

कोल्हापूर, १६ मार्च (वार्ता.) – विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणे हा छत्रपती शिवरायांचाच अवमान असून ही अतिक्रमणे प्रशासनाने येत्या १ मासात त्वरित न हटवल्यास या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ते श्री. सुनील घनवट आणि कृती समितीचे सदस्य श्री. बाबासाहेब भोपळे यांनी १६ मार्च या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

श्री. सुनील घनवट

श्री. सुनील घनवट आणि श्री. बाबासाहेब भोपळे पुढे म्हणाले की,

१. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकोट हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहेत. यातीलच एक गडकोट म्हणजे जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील विशाळगड आहे.

२. ३५० वर्षांनंतरही ऊन, वारा, पाऊस आणि मानवी आक्रमणे यांना तोंड देत हा गड आजही उभा आहे; मात्र शिवछत्रपतींचा हा अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आज दुरवस्थेत आहे.

३. तेथील विविध स्मारके ही पराक्रमाची साक्ष देणारी प्रेरणास्थाने आहेत. हिंदवी स्वराज्याचा वारसा असणार्‍या या गडकिल्ल्यांसाठी अनेक शूरवीर मावळ्यांनी रक्त सांडले आहे. विशाळगडासारख्या इतर किल्ल्यांवर गेल्यावर आजही आपल्याला पराक्रमी इतिहासाचा अभिमान वाटून उर भरून येतो.

४. शिवछत्रपतींच्या विशाळगडाच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच गडावरील अतिक्रमणे १ मासात हटवून दुर्लक्षित वीरपुरुषांची स्मारके आणि मंदिरे यांचा शासनाने जीर्णोद्धार करावा, अशा मागण्याही शिवशाहीचा आदर्श सांगणार्‍या राज्य शासनाकडे करत आहोत.

५. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही प्रतापगडाच्या पायथ्याशी अनधिकृतपणे उभारलेल्या अफझलखानाच्या थडग्याच्या भोवती झालेले अतिक्रमण हटवले जात नाही.

विशाळगड आणि परिसरातील दुरवस्था दर्शवणारी काही उदाहरणे  !

१. गड आणि मंदिरे यांच्या दूरवस्थेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

श्री वाघजाई मंदिर हे विशाळगडवासियांचे ग्रामदैवत आहे. या मंदिराच्या भिंती आता भूमीपासून केवळ १ फूट शिल्लक असून मंदिरासमोरील एक नक्षीदार खांब आणि देवळात वाघावर स्वार असणारी वाघजाईदेवीची मूर्ती भग्नावस्थेत आहे. यांसह विठ्ठल मंदिर, नृसिंह मंदिर, श्री विठ्ठलाईदेवी मंदिर, श्रीराम मंदिर यांसह अनेक मंदिरे आणि गड यांच्या तटबंदीची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. गडावर अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे.

२. वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीकडे दुर्लक्ष !

स्वराज्यासाठी बलीदान देणारे वीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या पराक्रमाची साक्ष या भूमीत आहे, त्यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत.  या नरवीरांच्या समाधीसाठी पुरातत्व विभागाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. शिवरायांच्या सूनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. शिवप्रेमींनी स्वव्ययाने समाधीवर छत बांधले. समाधीपर्यंत जाण्यासाठी पायवाटही नाही. समाधीविषयी माहिती देणारा साधा फलकही लावलेला नाही.

३. गेल्या २० वर्षांत विशाळगडावर अनेक अतिक्रमणे !

वर्ष १९९८ मध्ये हा गड पुरातत्व विभागाने स्वतःच्या नियंत्रणात घेतला. यानंतरही या गडावर मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झालेली आहेत. या संदर्भात माहितीच्या अधिकारात वर्ष १९९७-९८ आणि वर्ष २०१५-१६ ते २०१८-१९ या वर्षांच्या मिळकत कर आकारणीच्या सूचीमध्ये २०० चौरस फुटांपासून ते २.५ गुठ्यांपर्यंत ही तफावत आढळते. विशेष म्हणजे गड पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात असतांनाही नियम आणि कायदे धाब्यावर बसवून स्थानिक प्रशासनाने लोकांना या गडावर बेघर योजनेतून घरे बांधून दिली आहेत. त्या वेळी संमत केलेले क्षेत्रफळ २८८ चौरस फूट होते; पण आता ते १ सहस्र २०० ते २ सहस्र १३ चौरस फूट वाढल्याचे दिसते. गडावर अशी अनेक बांधकामे असून सर्वच ठिकाणी त्यांचे क्षेत्रफळ वाढल्याचे दिसते, तसेच ‘इंदिरा आवास घरकुल योजने’अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचीही तीच अवस्था आहे.

४. ‘ग्रामपंचायत गजापूर विशाळगड’ यांच्याकडून बांधकामास देण्यात आलेली अनुमती अवैध !

या संदर्भात माहितीच्या अधिकारात मिळालेल्या २७ जानेवारी २०१६ च्या पत्रामध्ये ‘या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि बांधकामे झाली आहेत’, असे पुरातत्व खात्याने मान्य केले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमणास ‘ग्रामपंचायत गजापूर विशाळगड’ यांच्याकडून बांधकामास देण्यात आलेली अनुमती अवैध असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, तसेच ‘ही बांधकामे त्वरित काढून घ्यावीत’, असेही नमूद केले आहे आणि यापुढे अनुमती देण्यात येऊ नये, असे पत्र पुरातत्व विभागाने ग्रामपंचायत, कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि शाहुवाडी तहसीलदार यांना पाठवले आहे. ५ वर्षांनंतरही या गडावर झालेले अवैध बांधकाम तसेच आहे. उलट नवीन बांधकामेही होत आहेत. यावर पुरातत्व खाते, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी काही केलेले नाही.

विशाळगडाचे होणारे इस्लामीकरण रोखणे अत्यंत आवश्यक !

विशाळगड येथे वर्ष १९९७ पूर्वी असलेले मंदिर आणि मशिदी यांचे क्षेत्रफळ पाहिल्यास वर्ष २०१५ नंतर काही ठिकाणी मंदिरांचे क्षेत्रफळ अल्प झाले आहे, तर काही ठिकाणच्या मंदिरांच्या नोंदी दिसत नाहीत. एकीकडे मंदिरांची संख्या अल्प होत असून मशिदींची संख्या आणि क्षेत्रफळ वाढत असल्याचे दिसते. इतिहासकारांच्या मते स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आलेला सरदार ‘मलिक रेहान’ मारला गेला. त्याच्या नावाने (रेहानबाबा) येथे प्रतीवर्षी उरूस भरवला जातो, तसेच रेहानबाबा नावाने मोठा आर्.सी.सी. दर्गा गडावर बांधण्यात आलेला आहे. त्याच्या दर्शनासाठी आणि नवस बोलण्यासाठी प्रतिदिन अनेक लोक येथे येतात.

श्रीवाघजाई मंदिराच्या समोरच उजव्या हातास एक स्वच्छ पाण्याचा झरा आहे. त्याठिकाणी घोड्याच्या टाप्याच्या आकाराचे नैसर्गिक चिन्ह आहे. पूर्वापार चालत आलेले हे चिन्ह एक हिंदु स्मारक असतांना यावर कट्टरतावाद्यांनी अतिक्रमण करून ते रेहानबाबाचे तीर्थ असल्याची खोटी माहिती पर्यटकांना दिली जात आहे.

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती यांनी पुढील मागण्या केल्या आहेत…

१. वर्ष १९९८ पूर्वी ज्या नोंदी शासनाकडे आहेत, केवळ त्याच ग्राह्य धरून उर्वरित सर्व बांधकामे आणि अतिक्रमणे १ मासाच्या आत शासनाने काढून टाकावीत. या प्रकरणी आजपर्यंत विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरे-समाध्यांची दूरवस्था याला कारणीभूत असणार्‍या पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

२. गडावरील अतिक्रमणे जोपर्यंत पूर्णपणे हटत नाहीत, तोपर्यंत पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी विशाळगडाला सप्ताहातून एकदा भेट द्यावी आणि तेथील अहवाल पारदर्शीपणे शासनाला सादर करावा.

३. पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्राम लोकांसमोर येण्यासाठी याचे एक ऐतिहासिक ‘भव्य स्मारक’ उभारण्यात यावे, तसेच गडाच्या पायथ्यापासून गडाच्या टोकापर्यंत असणारी सर्व मंदिरे, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे यांचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावावेत.

४. गडाचे पावित्र्य भंग करणार्‍या गोष्टींवर (उदा. मद्यपान, मांसविक्री), तसेच आरोग्यास हानी पोचवणार्‍या सर्वच गोष्टींना प्रतिबंध करावा. पर्यटकांच्या गडावरील निवासव्यवस्थेमुळे अनेक अयोग्य गोष्टी होतात, त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सर्व पर्यटकांची निवासव्यवस्था गडाच्या पायथ्याशी करावी.

५. गडाची ग्रामदेवता असणार्‍या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्यात यावा.

विशाळगडाचा इतिहास !

ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याची उभारणी इ.स. १०५८ च्या सुमारास शिलाहार राजांच्या काळात करण्यात आली. प्रारंभीच्या काळात या किल्ल्यास ‘खेळणा’ या नावाने संबोधण्यात येत असे. वर्ष १६५९ मध्ये हा किल्ला स्वराज्यात भरती झाल्यानंतर छत्रपती शिवरायांनी त्याचे ‘विशाळगड’ असे नामकरण केले. देवगिरीच्या पाडावानंतर संपूर्ण हिंदुस्थान पारतंत्र्यात असला, तरी सह्याद्रीच्या साहाय्याने काही छोटी-छोटी राज्ये स्वतःचे अस्तित्व टिकवून होती, त्यातील एक म्हणजे महाराष्ट्रातील खेळणा उपाख्य विशाळगड !

हा गड खर्‍या अर्थाने ओळखला जाऊ लागला तो मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाने ! पन्हाळागडावरून छत्रपती शिवराय सिद्दी जौहर याच्या वेढ्यातून स्वत:ची सुखरूप सुटका करून घेऊन याच गडावर पोचले. महाराज सुखरूप विशाळगडावर पोचावेत, यासाठी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून शत्रूला घोडखिंडीत रोखून धरणारे बाजीप्रभु देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभु देशपांडे यांच्यासह ३०० मावळ्यांच्या अद्वितीय पराक्रमाने ती घोडखिंड पावन झाली. आज तीच घोडखिंड ‘पावनखिंड’ या नावाने ओळखली जाते.

पत्रकार परिषदेत झालेली प्रश्‍नोत्तरे…

१. कृती समितीची पुढील भूमिका काय असणार आहे ?

श्री. सुनील घनवट – विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आणि पुरातत्व खात्यातील अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी १९ मार्च या दिवशी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात येणार आहे. याचदिवशी महाराष्ट्रात ‘ऑनलाईन’ आंदोलनही असणार आहे, तसेच कृती समितीच्या वतीने याविषयी जिल्हाधिकार्‍यांना शिष्टमंडळ भेटून चर्चा करणार आहे.

२. अनेक वर्षांपासून विशाळगडावर अतिक्रमणे चालू असतांना कृती समितीने एवढ्या विलंबाने माहिती का दिली ?

श्री. सुनील घनवट – विशाळगडावर अतिक्रमणे झाली आहेत, याची सत्य आणि परिपूर्ण माहिती कृती समितीच्या सदस्यांना मुळातच विलंबाने मिळाली. ही माहिती वर्ष २०१६ पासून ते वर्ष २०२० पर्यंत मिळाली. या काळात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता ती माहिती स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन, पुरातत्व खाते, तहसीलदार यांनी लवकर न देता ते ती माहिती लपवत होेते. आम्ही सातत्याने पत्र व्यवहार केल्यानंतरच आम्हाला वरील खात्यांकडून कागदोपत्री माहिती देण्यात आली. त्यानंतर आम्हाला विशाळगडावर अनेक अनधिकृत बांधकामे झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे जिल्हाधिकांच्या अखत्यारीत विशाळगडाचा विषय येत असतांनाही पत्रव्यवहार केल्यानंतर जिल्हाधिकारी, तहसीलदार ‘हा विषय आमच्याकडे येत नाही’, असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. ही आश्‍चर्याची गोष्ट आहे.

३. विशाळगडाचा विषय जिल्हा परिषदेकडे येत असतांना तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार का केली नाही ?

(ही ग्रामपंचायत आहे. विशाळगडाचा विषय जिल्हा परिषदेकडे येत असल्याने तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन द्या. ते तुमची नोंद घेतील, अशी सूचना एका पत्रकाराने केली.)

श्री. सुनील घनवट – आज पत्रकार परिषद घेऊन हा विषय उघड केला आहे. या संदर्भात जे जे कुणी संबंधित अधिकारी आहेत, त्या सर्वांनाच भेटून आम्ही निवेदन देणार आहोत. याविषयाच्या संबंधित मागण्या करणार आहोत. आपण पत्रकारांनी केेलेल्या सूचनांचे स्वागत करतो. विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी आतापर्यंत आम्ही ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, पुरातत्व खाते, तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून माहिती मिळवली आहे. आता याविषयी आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनाही निवेदन देऊ.

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना !

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या बैठक प्रसंगी प्रवक्ता सुनील घनवट आणि अन्य

कोल्हापूर – विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरांची दूरवस्था, तसेच या संदर्भातील प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी कोल्हापूर येथे १४ मार्च २०२१ या दिवशी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने निवेदन, आंदोलन, तसेच विविध मार्गांने जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले.

या कृती समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे आहेत

१. ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ते श्री. सुनील घनवट

२. ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे समन्वयक श्री. किरण दुसे

अन्य सदस्य

श्री. संभाजीराव भोकरे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), सदस्य – शिरोली येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव (उपसरपंच, शिवसेना), मलकापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार, मलकापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ, श्री महालक्ष्मी भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे आणि कृती समितीचे कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता समीर पटवर्धन, श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. राजू यादव (शिवसेना करवीरतालुकाप्रमुख), श्री. शरद माळी (हिंदुत्वनिष्ठ)