प्रांताधिकार्यांच्या आदेशाला ग्रामसेवकाने दाखवली केराची टोपली
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास याचे दायित्व कुणावर ? जनतेला शिस्त लावण्यासाठी कठोर शिक्षापद्धत अवलंबणेच आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !
सातारा – देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांतील आठवडा बाजार पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार हा १२ मार्चपर्यंत बंद करण्याचा आदेश कोरेगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी काढला होता; परंतु १२ मार्च या दिवशी वाठार स्टेशन येथील आठवडा बाजार मोठ्या स्वरूपात भरवण्यात आला. त्यामुळे वाठार स्टेशन ग्रामसेवकांनी प्रांताधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी जिल्हा प्रशासन ग्रामसेवकांवर कोणती कारवाई करणार ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.