‘ऑनलाईन कार्यक्रम सेवेतील उपकरणे म्हणजे ‘सहसाधक’ आहेत’, असा भाव ठेवून त्यांच्यावर आध्यात्मिक नामजपादी उपाय करा आणि कार्यक्रमात येणार्या आध्यात्मिक अडथळ्यांवर मात करा !
सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !
‘कोरोना दळणवळण बंदीच्या काळात परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांंच्या कृपेने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे विविध ऑनलाईन उपक्रम चालू झाले आणि सध्या ते नियमितपणे चालू आहेत. यांत अनेक विषयांचे परिसंवाद, प्रतिदिन होणारे सत्संग आणि विविध शिबिरे इत्यादींचा समावेश आहे. हे ऑनलाईन उपक्रम कोणतेही आध्यात्मिक अडथळे न येता निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी संत विविध आध्यात्मिक नामजपादी उपाय सांगतात आणि ते स्वत:ही करतात. जरी संत उपाय करत असले, तरी साधकांनीही आपल्या स्तरावर आवश्यक ते आध्यात्मिक उपाय न चुकता करणे आवश्यक आहे.
या ऑनलाईन उपक्रमांच्या सेवेतील संगणक, भ्रमणसंगणक अथवा अन्य तांत्रिक उपकरणे ही आपले ‘सहसाधक’ आहेत, या सहसाधकांच्या माध्यमातून आपली समष्टी सेवा होणार आहे, या कृतज्ञताभावाने जोडावी. त्यांच्यासाठी भावपूर्ण प्रार्थना करावी आणि त्यांची शुद्धी करावी. आपण भावाच्या स्तरावर उपाय आणि त्यांची शुद्धी केल्याने तेथे ईश्वरी तत्त्व कार्यरत होऊन तांत्रिक सेवेतील अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर होऊ शकतील. परिणामी, धर्मप्रसारातील अडथळे दूर होण्यास साहाय्य होईल. यासाठी आपण गुरुचरणी शरण राहून योग्य क्रियमाण वापरणे आवश्यक आहे.
साधकांनो, या आपत्काळातही केवळ गुरुकृपेनेच ऑनलाईन (आकाशतत्त्वाच्या) माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य वेगाने वाढत आहे, अवघ्या विश्वात श्री गुरुंची कीर्ती दिगंत होत आहे, याविषयी अखंड कृतज्ञ रहा आणि सेवेतील (उपकरणरूपी) सहसाधकांवर भावपूर्ण आध्यात्मिक नामजपादी उपाय करून कार्यक्रमात येणार्या आध्यात्मिक अडथळ्यांवर मात करा !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (१५.०१.२०२१)