मनसुख हिरेन यांचा मृतदेह १० घंटे पाण्यात, तोंडवळा आणि पाठ यांवर जखमेच्या खुणा !

मनसुख हिरेन

मुंबई – ठाणे येथील ‘क्लासिक मोटर्स’चे मालक मनसुख हिरेन यांचा प्रारंभिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार यांचा मृतदेह अनुमाने १० घंटे पाण्यात होता. त्यांचा तोंडवळा आणि पाठ यांवर जखमांच्या खुणा सापडल्या आहेत. जखम कधी आणि कशी झाली, याचा उल्लेख अहवालात नाही, तसेच काही अधिकृत वक्तव्यही नाही. मनसुख यांचा ‘व्हिसेरा’ पडताळण्यासाठी कलिना येथील ‘फॉरेंसिक सायंसेस’ प्रयोगशाळेत पाठवला आहे. त्याचा अहवाल १५ दिवसांनंतर मिळाल्यानंतर अनेक प्रश्‍नांची उत्तरे स्पष्ट होतील.

५ मार्च या दिवशी मनसुख यांचा मृतदेह ठाणे येथील कळवा खाडीत सापडला होता. पोलिसांनी हिरेन यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले होते; परंतु कुटुंबियांनी ते नाकारले. अहवालावरून समजते की, मृतदेह मिळण्याच्या १२-१३ घंट्यांपूर्वी मनसुख यांचा मृत्यू झाला होता. अहवालात दिनांक आणि वेळ यांचा उल्लेख नाही. मनसुख यांच्या चेहर्‍यावरील रूमालांविषयी कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही, तसेच शवविच्छेदन अहवालातही याचा उल्लेख नाही.

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा गुन्हा नोंद

ठाणे – येथील आतंकवादविरोधी पथकाने पत्नी आणि मुलगा यांच्या तक्रारीवरून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंब्रा खाडीच्या जागेवर मृतदेह आढळला त्या ठिकाणी पथकाने पाहणी केली.

‘केमिकल अ‍ॅनालिसिस’ अहवालामधून मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे कारण उलगडण्याची शक्यता !

मुंबई – मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल आला; मात्र त्यातून हिरेन यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ‘केमिकल अ‍ॅनालिसिस’चा अहवाल हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये काही घातपात झाला असेल, तर तेही स्पष्ट होते.

शवविच्छेदनाच्या अहवालमधून मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्यास ‘केमिकल अ‍ॅनालिसिस’चा अहवाल सिद्ध केला जातो. यात मृत व्यक्तीची ‘व्हिसेरा’ चाचणी केली जाते. यामध्ये शरिरातील आतील अवयवांची चाचणी केली जाते, त्यात कुठले विषारी द्रव्य दिले आहे का ?, याची चाचणी होते. त्या विषात कुठल्या प्रकारचे ‘केमिकल्स’ वापरले गेले आहेत ? त्या ‘केमिकल्स’चा वापर कुठे-कुठे केला जातो, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे ‘व्हिसेरा’ अहवालमध्ये मिळतात.