ऑक्सफर्डचा हिंदुद्वेष !

आजच्या तरुणाईला भारतातील विद्यापिठांपेक्षा विदेशातील विद्यापिठांचे अधिक आकर्षण असते. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी अशा मोठमोठ्या विद्यापिठांमध्ये शिक्षण घेणे प्रतिष्ठेचे समजतात. त्यातीलच एक म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठ ! आज हेच विद्यापीठ चर्चेत आले आहे ते रश्मी सामंत हिच्यामुळे ! भारतीय वंशाची रश्मी सामंत ही निवडणुकीद्वारे नुकतीच ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन’ची अध्यक्षा झाली. इतका मोठा सन्मान मिळाल्याने ती या कौतुकास पात्र ठरलेली भारतातील पहिली महिला ठरली. रश्मीने ३ युरोपियन विद्यार्थ्यांचा पराभव करत हे यश संपादन केले. ‘रश्मीने खरोखरच इतिहास रचला’, असे म्हणता येईल. त्यामुळे ही घटना भारताच्या इतिहासात मानाचा तुरा रोवणारी ठरली. अर्थात् काही जणांना कुणाचेही चांगले झालेले पहावत नाही. त्यातही एखादा हिंदु असेल, तर त्याच्या विरोधात वातावरण हे अगदी सहजगत्या निर्माण केले जाते आणि ते तसे निर्माण होतेही ! हीच हिंदुद्वेषी मानसिकता आज सर्वत्र विष पेरत आहे. याचा प्रत्यय रश्मी हिलाही तिच्या यशानंतर आला.

रश्मीचे कुटुंबीय श्रीराममंदिराचे समर्थक असल्याचे तिच्या एका सामाजिक संकेतस्थळावरील लिखाणाद्वारे समजले. त्या छायाचित्रात तिच्यासमवेत तिचे एक कुटुंबीय दिसत असून त्याखाली श्रीराममंदिराच्या समर्थनार्थ घोषणाही दिलेल्या आहेत. या लिखाणामुळे पुष्कळ वादंग निर्माण झाला आणि तिला टीकेला सामोरे जावे लागले. तिच्या संदर्भात धर्मविरोधी आणि वर्णद्वेषी वातावरणच निर्माण केले गेले. शेवटी तिला अध्यक्षपद प्राप्त झाल्याच्या दोनच दिवसांत पदाचे त्यागपत्र द्यावे लागले. आता ती कुटुंबियांसमवेत भारतात परतली आहे. ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन’च्या महिला अध्यक्षावर ही वेळ येणे दुर्दैवीच म्हणावे लागेल. या संपूर्ण विरोधाचे एकमेव कारण ठरले ते म्हणजे रश्मीचे हिंदुत्व ! तिने केलेल्या हिंदुत्वाच्या विचारसरणीचे, तसेच श्रीराममंदिराचे समर्थनच टीकाकारांना झोंबले. अर्थात् अशा घटना काही नवीन नाहीत. देश-विदेशातील अनेक हिंदूंना अशा प्रकारच्या टीका-टिपण्यांना तोंड द्यावेच लागते. त्यांच्यावर अत्याचार आणि आघात होतात. हे असे जरी होत असले, तरी धर्मासाठीच्या या वैचारिक संघर्षाच्या माध्यमातून हेच हिंदुत्व आज तावून सुलाखून निघत आहे, हे निश्‍चित ! त्यामुळे विरोधकांनी हिंदूंचे पाय ओढण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी हिंदुत्व हे सोन्याप्रमाणे झळाळून निघणारच आहे, हे लक्षात घ्यावे !

मानवाधिकार संघटना गप्प का ?

रश्मी सामंत हे एक निमित्त ठरले; पण हिंदु धर्माला लक्ष्य करण्याच्या भयानक षड्यंत्राचा प्रत्यय ब्रिटनसारख्या राष्ट्रात आला. एकप्रकारे हिंदूंना हीन आणि तुच्छ लेखण्याचाच प्रकार घडला. एरव्ही अल्पसंख्य समुदायावर कुणीही टीका किंवा आक्रमण केले, तर जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या मानवाधिकार संघटना असहिष्णुता वाढल्याची ओरड करू लागतात. विदेशात नोकरी किंवा शिक्षण यांत प्रवेश मिळवण्यासाठी भारतियांना एकदम कडक नियम लागू केलेले असतात. त्यांना वर्ण, धर्म अशा सर्वच स्तरांवरील जाचक नियमांना सामोरे जावे लागते, असा बहुतांश भारतियांना अनुभव आहे. विदेशींना मात्र तितकासा त्रास सहन करावा लागत नाही. भारतियांसाठी अशा द्वेषपूर्ण वागणुकीची कसोटी म्हणजे ‘एकप्रकारे अडथळ्यांची शर्यतच ठरते’, असे म्हणता येईल. असाच काहीसा प्रकार रश्मीच्या संदर्भात झाला.

वंशवादामुळे ११ दिवसांत रश्मी सामंत हिला ऑक्सफोर्ड स्टूडंट युनियनच्या अध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा लागला !

विद्यापिठाचे षड्यंत्र !

विद्यापिठात रश्मीच्या सहकार्‍यांकडून केल्या जाणार्‍या टीकेच्या विरोधात विद्यापिठाने काय कारवाई केली ? रश्मीचे कुटुंब श्रीराम समर्थक असले, तर विद्यापिठाला त्याची काय अडचण आहे ? विरोध करणार्‍या सहकार्‍यांना विद्यापिठाने वेळीच का सुनावले नाही ? या प्रश्‍नांची उत्तरे विद्यापीठ प्रशासन देईल का ? रश्मी अध्यक्षपदावर निवडून आली असतांनाही तिचे त्यागपत्र घेणे, हे विद्यापिठाच्या दृष्टीने लज्जास्पदच आहे. वास्तविक विद्यापिठाने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे आवश्यक होते. महत्त्वाचे म्हणजे ती निवडणूक प्रक्रियेतून अध्यक्ष झाली होती. त्यामुळे तिला त्यागपत्र देण्यास भाग पाडणार्‍यांवर खरेतर कारवाई होणे अपेक्षित होते. विदेशातील ऑक्सफोर्ड किंवा अन्य विद्यापिठे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, मानवाधिकार, भाषणस्वातंत्र्य आदी सूत्रांविषयी संवेदनशील असतात. मग ही संवेदनशीलता रश्मी सामंत हिच्या संदर्भात का दाखवण्यात आली नाही ? जर्मनी, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया या देशाचा विद्यार्थी जर रश्मी सामंत हिच्या जागी असता, तर विद्यापिठाने अशीच भूमिका घेतली असती का ?

(चित्रावर क्लिक करा)

यात आणखी एक गंभीर सूत्र म्हणजे रश्मी सामंत हिला विरोध करणारे विद्यापिठातील काही हिंदुद्वेष्टे आणि भारतद्वेष्टे साम्यवादी आहेत. हे चिंताजनक आणि संताप आणणारे आहे. साम्यवादी विचारसरणीचा भारतीय विद्यापिठांमध्ये शिरकाव झाल्यामुळे भारतातील तरुण पिढ्या वाया जात आहेत. तेच आता विदेशातील विद्यापिठांमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळेच रश्मी सामंत हिने दिलेल्या त्यागपत्राची घटना भारताच्या दृष्टीने गंभीर आहे. दुसरे सूत्र म्हणजे विदेशात शिक्षण घेऊ पहाणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांनीही या घटनेविषयी चिंतन करावे. विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे कि भारतप्रेम आणि धर्मप्रेम यांना महत्त्व द्यायचे ? या पर्यायावर त्यांनी अवश्य विचार करावा.

रश्मी सामंत प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करावेत. यासाठी ट्विटरवरून राष्ट्रप्रेमी आणि हिंदुप्रेमी भारतियांनी मोहीमही हाती घेतली होती; मात्र तितके पुरेसे नाही. यासाठी विविध व्यासपिठांवरून विरोध व्हायला हवा. त्यातही ऑक्सफर्डसारखे अभिव्यक्तीस्वातंत्र्याची झूल पांघरणार्‍या विद्यापिठांची तत्त्वे किती पोकळ आणि बेगडी असतात, हे जगासमोर उघड व्हायला हवे. यासाठी भारतातील बुद्धीजिवींनी पुढाकार घ्यायला हवा. भारत सरकारची भूमिकाही यात महत्त्वाची आहे. भारतात ऑक्सफर्डच्या तोडीची विद्यापिठे निर्माण झाली, तर विदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ आपोआपच अल्प होईल. त्या वेळीच खर्‍या अर्थाने ऑक्सफर्डसारखी विद्यापिठे ताळ्यावर येतील !