साधकांवर प्रीती करणारे आणि ‘त्यांची साधना व्हावी’, यासाठी प्रयत्नरत असणारे प.पू. दास महाराज अन् पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक !

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

प.पू. दास महाराज यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. साधिकेने लग्नानंतर गावी गेल्यावर ‘येथे माझे कुणीच नातेवाईक नाहीत’, असे मनोमन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगणे आणि अनेक संतांनी साधिकेला ‘तू आमची मुलगी आहेस’, असे म्हणणे

‘प.पू. बाबा (प.पू. दास महाराज) मला नेहमी म्हणतात, ‘‘मांडवी, आपल्या आधीच्या जन्मात तू आमची मुलगी असणार’, असे मला वाटते.’’

माझे लग्न झाल्यावर मी मुंबईहून गावी (सावंतवाडी येथे) आले. तेव्हा मी मनातून परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले, ‘परात्पर गुरु डॉक्टर, इथे माझे कुणीच नातेवाईक नाहीत.’ त्यानंतर पू. गोगटेगुरुजी, प.पू. परुळेकर महाराज, प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) यांच्याशी माझा परिचय झाला. या सर्व संतांनी मला ‘तू आमची मुलगी आहेस’, असे सांगणे’, ही माझ्यासाठी एक विलक्षण अनुभूती आहे. प.पू. बाबा मला नेहमी अधूनमधून ‘तू आमची मुलगी आहेस’, याची आठवण करून देतात.

२. साधिकेकडून प.पू. दास महाराज आणि पू. माई यांना भ्रमणभाष करायचा राहून गेल्यावर तेच भ्रमणभाष करून साधिकेची विचारपूस करत असणे अन् त्यांचे प्रेम पाहून साधिकेचे मन कृतज्ञतेने भरून येणे

माझ्याकडून प.पू. दास महाराज आणि पू. माई यांना भ्रमणभाष करायचा राहून गेल्यास मला त्यांच्या संदर्भात स्वप्न पडते. मग मी त्यांना भ्रमणभाष करून मला पडलेले स्वप्न सांगते. मी बरेच दिवस त्यांना भ्रमणभाषवर संपर्क केला नाही, तर त्यांचाच भ्रमणभाष येतो. ‘सर्व जण कसे आहेत ? खुशाली समजली नाही; म्हणून भ्रमणभाष केला’, असे ते म्हणतात. त्यांचे हे प्रेम पाहून ‘देवा, कसे हे तुझे प्रेम !’, असे वाटून माझे मन कृतज्ञतेने भरून येते.

३. मुंबई येथील सेवाकेंद्रात सत्संगाला जाण्यासाठी साधिकेला प्रोत्साहन देणे

३ अ. साधिंकेने प.पू. दास महाराज यांना ती सत्संगाला जाणार असल्याचे सांगणे आणि प.पू. दास महाराज यांनी ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव सांगत असलेले सर्व नीट समजून घेण्यास सांगणे ः एकदा मी मुंबई येथील सेवाकेंद्रात सत्संगाला जाणार होते. त्या आधीच प.पू. बाबांचा भ्रमणभाष आला होता. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मी आणि कु. सनातन (माझा मुलगा) सेवाकेंद्रात जात असून तेथे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव सत्संग घेणार आहेत.’’ तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू सांगतील, ते सर्व नीट समजून घे. तुला नाही समजले, तर त्यांना पुनःपुन्हा विचार. सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू तुला न कंटाळता प्रेमाने सांगतील.’’ प.पू. बाबा हे सर्व मला अत्यंत प्रेमाने सांगत होते.

३ आ. सत्संगाला जाण्याच्या आदल्या दिवशी साधिकेला पुष्कळ मानसिक त्रास होणे आणि साधिका मनोमन परात्पर गुरु डॉक्टरांना ‘तुम्ही मला शक्ती द्या’, अशी प्रार्थना करत झोपल्यावर तिला स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टर दिसणे अन् दुसर्‍या दिवशी प.पू. दास महाराज साधिकेशी भ्रमणभाषवर बोलल्यावर साधिकेला तिचा त्रास दूर झाल्याचे जाणवणे ः खरेतर प्रत्यक्षात सत्संगासाठी जाण्याच्या आदल्या दिवशी मला पुष्कळ मानसिक त्रास होत होता. माझ्या मनात ‘सत्संगाला जायला नको. जाऊन काही उपयोग नाही’, असे नकारात्मक विचार येत होते. तेव्हा मी मनोमन परात्पर गुरु डॉक्टरांना ‘तुम्ही मला शक्ती द्या’, अशी प्रार्थना करत त्या रात्री झोपले. तेव्हा मला स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टर दिसले. त्यांनी त्यांच्या एका हाताने माझा हात आणि दुसर्‍या हाताने कु. सनातनचा हात धरला. ते आम्हा दोघांना सेवाकेंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेले. तेथे पोचल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर अंतर्धान पावले. ‘दुसर्‍या दिवशी प.पू. बाबांनी मला भ्रमणभाष करून माझ्याशी बोलून माझा मानसिक त्रास दूर केला’, असे मला जाणवले. ‘देवच मला शक्ती देऊन माझ्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करून घेत आहे’, असे वाटून परात्पर गुरु डॉक्टर, प.पू. बाबा, सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू यांच्याप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या अनंत कृपेमुळेच मला अनेक संतांचा सहवास लाभला. मला वेळोवेळी संतांचे मार्गदर्शन मिळत आहे. आपल्या या प्रीतीसाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘हे भगवंता, हे सर्व अनमोल क्षण मला अखंडपणे अनुभवायला देत आहेस, आनंदी ठेवत आहेस’, याविषयी कृतज्ञता !’

– सौ. मांडवी बुगडे, नवीन पनवेल, रायगड. (२४.२.२०२०)

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांच्याप्रती उत्कट भाव असलेला ६० टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. सनातन बुगडे (वय १५ वर्षे) !

‘एकदा मी माझा मुलगा कु. सनातन याला सांगितले, ‘‘मला पू. माईंना एका प्रसंगाविषयी सांगावेसे वाटत आहे.’’ तेव्हा सनातनने माझे बोलणे पूर्ण ऐकून घेतले आणि तो मला म्हणाला, ‘‘आई, तू प.पू. बाबा आणि पू. माई यांना सामान्य समजू नकोस. ते संत आहेत. त्यांच्यात पुष्कळ चैतन्य आहे. त्यांच्यामुळेच हा संपूर्ण परिसर चैतन्याने भारित आहे. तू त्यांना तुझ्या अल्प बुद्धीने काही सांगू नकोस. त्यांना ‘योग्य-अयोग्य’, हे लक्षात येते.’’

– सौ. मांडवी बुगडे, नवीन पनवेल, रायगड. (२४.२.२०२०)