नामजप करतांना सूक्ष्मातून प.पू. दास महाराज यांचे ‘दासमारुति’ या रूपात दर्शन होणे आणि परात्पर गुरुमाऊलींचे ‘प्रभु श्रीरामचंद्र’ या रूपात दर्शन होणे

श्री. जयेश थळी

१. नामजप करतांना अकस्मात् श्रीरामाचा नामजप चालू होऊन ध्यानात मारुतिरायाचे दर्शन होणे

​‘२८.७.२०२० (मंगळवार) या दिवशी प्रतिदिनप्रमाणे पहाटे लवकर उठून मी नामजप करत होतो. प्रतिदिनचा ‘श्री दुर्गादेवी’ हा जप झाल्यानंतर माझा आपोआप ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप चालू झाला. मला ध्यानात अकस्मात् मारुतिराया दिसले. ते आनंदाने नाचत होते.

२. ध्यानात मारुतिरायाशी झालेले संभाषण

मी : हा आनंद उत्सव कसला ?
मारुतिराया : माझे परमप्रिय प्रभु श्रीरामचंद्रांचे अयोध्येत मंदिर साकारणार आहे. त्यासाठी मी अत्यंत आनंदात आहे. मी तेथे सतत प्रभुसेवेत असतोच; पण ५.८.२०२० या दिवशी मी विशेष शक्तीसह संरक्षक कवचरूपात अयोध्येत कार्यरत असणार आहे. या आनंद सोहळ्यात सहभागी होणार्‍या श्रीरामनामात लीन अशा सर्वत्रच्या भक्तगणांना माझे हे संरक्षक कवच प्राप्त होईल.

३. सूक्ष्मातून प.पू. दास महाराज यांच्या खोलीत आपोआप पोचून त्यांचे ‘दासमारुति’ या रूपात दर्शन होणे आणि नंतर परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘प्रभु श्रीरामचंद्र’ या रूपात दर्शन होणे अन् देहभान हरपणे

​त्यानंतर प्रतिदिनप्रमाणे रामनाथी आश्रमाचे सूक्ष्मातून दर्शन करतांना ध्यानमंदिराचे दर्शन घेतल्यानंतर परात्पर गुरुमाऊलींचे सूक्ष्मातून दर्शन घेण्यासाठी मी त्यांच्या खोलीत जातो; पण आज मात्र तसे न होता मी प्रथम प.पू. दास महाराज यांच्या खोलीत आपोआप पोचलो. त्यांचे मला दासमारुति या रूपात दर्शन झाले आणि त्यानंतर मी परात्पर गुरुमाऊलींचे सूक्ष्मातून दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेलो. तेथे मला परात्पर गुरुमाऊलींचे प्रभु श्रीरामचंद्र या रूपात दर्शन झाले. या वेळी मला मोठ्या प्रमाणात आनंद लहरी जाणवून माझे देहभान हरपले.

४. मारुतिरायाला वानररूपात दर्शनाची प्रचीती मागितल्यावर खरोखर २ वानरांचे दर्शन होऊन अंगावर रोमांच उभे रहाणे आणि अनुभूतींची प्रचीती मागितल्याविषयी मारुतिरायाच्या चरणी क्षमायाचना करणे 

मी थोड्या वेळाने भानावर आल्यावर ‘ही अनुभूती आहे कि भास ?’, तेच मला कळेना. मी तर काहीच करत नाही. मग मला हे भगवंताचे दर्शन कसे झाले ? ‘सध्या श्रीराम मंदिर विषय डोक्यात असल्याने हा भास झाला असेल’, असे वाटून माझी मारुतिरायाच्या चरणी प्रार्थना झाली, ‘तूच याचे उत्तर दे. तुझे हे कृपादर्शन सत्य असल्यास आज दिवसभरात तुझे वानररूपी दर्शन घडू दे.’ नंतर मला दिवसभर आनंद जाणवत होता. संध्याकाळी आमच्या भागात खरोखर २ वानरे आलेली दिसल्यावर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझे पुन्हा एकदा देहभान हरपले. मी लगेचच देवघरात जाऊन या सर्व अनुभूतींविषयी प्रचीती मागितल्याविषयी मारुतिरायाच्या चरणी कान पकडून क्षमायाचना केली.

५. विशेष म्हणजे ३.८.२०२० या दिवशी मी ही अनुभूती सद्गुरु आपटेआजींना सांगत असतांना त्यांच्या घरी वानररूपी मारुतिराया आलेले दिसले.

६. प.पू. दास महाराजांनी अनुभूती लिहून देण्यास सांगणे

प.पू. दास महाराजांना ही अनुभूती सांगितल्यावर ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने ती लगेच लिहून पाठवा’, असे त्यांनी सांगितले होते, तरी माझ्याकडून लिहून देण्यास दोन दिवस विलंब झाला. त्यासाठी क्षमस्व ! मी प्रायश्‍चित्त घेत आहे.

७. रामा मी तव दास दास म्हणवी ।

रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय ?।
रामा जाईल ज्या स्थळी सुखघना होईल, तेथे जय !
​ही संपूर्ण अनुभूती ही सर्व परात्पर गुरुमाऊलींची कृपा आहे आणि या लिखाणाच्या माध्यमातून ही अनुभूती त्यांच्या पावन चरणी अर्पण !’
जय श्रीराम । श्री गुरुचरणार्पणमस्तु । कृतज्ञता !’

– श्री. जयेश थळी, म्हापसा, गोवा. (३.८.२०२०)