कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इतिहासात प्रथमच जोतिबा डोंगरावर खेटे भाविकांविना !

कोल्हापूर – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जोतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी असणारे सर्व रस्ते प्रशासनाने २८ फेब्रुवारी या दिवशी बंद केले. त्यामुळे दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे खेटे यंदा इतिहासात प्रथमच भाविकांविना होत आहेत. प्रशासनाने मंदिरात होणारे सर्व धार्मिक विधी अल्प मानकरी, पुजारी, भाविक यांच्या उपस्थित करण्यास अनुमती दिली आहे. मंदिर १ मार्चपासून सकाळी ७ ते दुपारी १२, तसेच दुपारी ३ ते रात्री ८ पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व खेट्यांची सांगता होणार आहे. गतवर्षी कोरोनामुळेच चैत्र यात्रा रहित करावी लागली होती. मध्यंतरी अल्प झालेले कोरोनाचे रुग्ण परत वाढत असल्याने २५ एप्रिल या दिवशी होणार्‍या चैत्र यात्रेवर यंदाही अनिश्‍चिततेचे सावट दिसत आहे.