सातारा, १ मार्च (वार्ता.) – म्हसवड तालुक्यातील पानवण येथे २७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी शेताच्या कामानिमित्त गेलेले आधुनिक वैद्य नानासाहेब शिंदे रात्री उशिरापर्यंत परत आले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी शोध घेण्यास प्रारंभ केल्यावर शेताच्या जवळील रस्त्यावर त्यांची चारचाकी आढळून आली. गाडीची तोडफोड झालेली होती. तसेच सीटवर अॅसिड सांडल्यामुळे सीट जळल्या होत्या. आधुनिक वैद्य नानासाहेब शिंदे यांचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळ आली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची निवडप्रक्रीया चालू आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पानवण येथील सहकारी संस्थेच्या वतीने आधुनिक वैद्य नानासाहेब शिंदे यांच्या नावाचा ठराव घेण्यात आला होता. या ठरावावरून आधुनिक वैद्य शिंदे यांचे अपहरण झाल्याचा प्रकार घडला आहे, अशी चर्चा गावात चालू आहे. आधुनिक वैद्य शिंदे हे पानवणच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. शिंदे यांचे पती आहेत.