कोरोनाविषयक निर्बंधांचा निर्णय येत्या ८ दिवसांत घेणार ! – विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे स्पष्टीकरण

पुणे – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता ही संख्या गेल्या वर्षी सप्टेंबर मासाच्या तुलनेत निम्म्यापर्यंत जाईल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस्.) या संस्थांनी केलेल्या कोरोनाच्या पहाणी अहवालात काढला आहे. वाढती रुग्णसंख्या न्यून करण्यासाठी उपाययोजनांचा अभ्यास करून दोन्ही संस्था त्याचा अहवाल येत्या आठ दिवसांत देतील. त्या अहवालानुसार पुण्यात कोणत्या प्रकारचे निर्बंध लागू करायचे, याविषयीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. यामध्ये शाळा, महाविद्यालये १ मास बंद ठेवणे, तसेच हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पार्सल सेवा चालू करणे, सार्वजनिक कार्यक्रम, तसेच लग्नसमारंभ २ मास बंद ठेवणे यासारखे निर्बंध लावल्यास रुग्णसंख्या कितीने न्यून होईल, याचा अभ्यास या संस्थांकडून मागितला आहे. संस्थांचा विश्‍लेषणात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निर्बंधांसंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे राव यांनी स्पष्ट केले.

कोरोना नव्हे, तर उपासमारीने मरू ! – कामगार संघटनांची भीती

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे औद्योगिक क्षेत्रावर पुष्कळ परिणाम झाला. त्यातून बाहेर पडून उद्योग, व्यवसाय आता सुरळीत होत आहेत; पण पुन्हा चालू असलेल्या दळणवळण बंदीच्या चर्चेमुळे औद्योगिक क्षेत्र उद्ध्वस्त होईल आणि कामगार कोरोनामुळे नव्हे, तर उपासमारीने मरतील, अशी भीती कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे.

दळणवळण बंदी नको ! – अरविंद जक्का, ‘आयटक’

‘सुरक्षित प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, नियमांची काटेकोरपणे कार्यवाही करणे, लसीकरणाचे प्रमाण वाढवणे या उपायात्मक गोष्टी करा; पण कोणत्याही परिस्थितीत दळणवळण बंदी नको’, असे मत ‘आयटक’चे शहर सचिव अरविंद जक्का यांनी व्यक्त केले.