भक्ती, शक्ती आणि युक्ती या त्रिसूत्रींनुसार युवकांनी जीवनात वाटचाल करावी ! – ह.भ.प. सोपानमहाराज भारमल

शिवजयंतीनिमित्त आयोजित कीर्तन सेवा

प्रतीकात्मक चित्र

सातारा, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज जीवनातील अडचणींना सामोरे जातांना कधीही डगमगले नाहीत. आई तुळजाभवानीचा नामजप, सतत युद्धाभ्यास आणि वेळप्रसंगी युक्तीने गनिमी कावा यांचा उपयोग करत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा अनोखा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. त्यामुळे छत्रपती शिवरायांप्रमाणे युवकांनीही भक्ती, शक्ती आणि युक्ती या त्रिसूत्रींनुसार जीवनामध्ये वाटचाल करावी, असे आवाहन बालकीर्तनकार ह.भ.प. सोपानमहाराज भारमल यांनी केले.

‘युवा नेतृत्व संघटन अखंड हिंदुस्थान’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील श्रीक्षेत्र कोतुळ (भक्तीपीठ) या ठिकाणी आयोजित कीर्तनसेवेत ते बोलत होते. या वेळी ‘युवा नेतृत्व संघटन अखंड हिंदुस्थान’चे भक्तीपीठप्रमुख प.पू. गुरुवर्य श्री लोहकरे महाराज, संघटनप्रमुख श्रीनाथ सुराशे उपस्थित होते.

१८ फेब्रुवारी या दिवशी शासकीय नियमांचे पालन करत ‘युवा नेतृत्व संघटन अखंड हिंदुस्थान’च्या वतीने नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील श्रीक्षेत्र कोतुळ ते किल्ले श्री पेमगिरी अशी भव्य श्री शिवपालखी काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात ७० हून अधिक शिवभक्त सहभागी झाले होते. सायंकाळी पालखी किल्ले श्री पेमगिरी गडावर पोचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती झाली. नंतर महाप्रसाद झाला. किल्ले पेमगिरी गडावरून शिवज्योत आणि पालखी घेऊन शिवभक्त पुन्हा श्रीक्षेत्र कोतुळ येथे आले. दुसर्‍या दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत बालकीर्तनकार ह.भ.प. सोपानमहाराज भारमल यांचे शिवजन्मावर सुश्राव्य कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव पार पडला आणि मंत्रपुष्पांजली झाली. दुपारी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. या शिवजयंती सोहळ्याचा लाभ परिसरातील १५० हून अधिक शिवभक्तांनी घेतला.