वीजदेयक हप्त्यांमध्ये भरण्याची सोय उपलब्ध करून देण्याची सूचना
कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही वीजग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करू नये आणि कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेल्या व्यापारीवर्गाने वीजदेयके भरण्याविषयी दिलेल्या प्रस्तावानुसार सर्वांना वीजदेयके हप्त्यांमध्ये भरण्याची सोय करून द्या, असे निर्देश सिंधुदुर्ग दौर्यावर असलेले पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र वीजवितरण आस्थापनाला दिले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून वीजवितरण आस्थापनाने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या चालू केलेल्या कारवाईची टांगती तलवार दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वीजदेयकांविषयी जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्ये यांनी पालकमंत्री सामंत यांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोनाच्या काळात दिलेली सरासरी वीजदेयके आपणास मान्य नाहीत. कोरोना काळात लागू करण्यात आलेली वीज दरवाढ परत घ्या. कोरोना काळातील वापरलेल्या विजेच्या रकमेच्या व्यतिरिक्त अन्य सर्व कर, आकार आणि व्याज माफ करा. कोरोना काळातील एप्रिल ते सप्टेंबर या सहा मासांतील वीजदेयके ही विवादित गोष्ट समजून ऑक्टोबरपासूनची देयके स्वीकारा आदी मागण्यांसाठी व्यापारी महासंघाने शासन, प्रशासन आणि वीजवितरण आस्थापन यांच्याकडे निवेदने सादर केली होती. याविषयी सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास १ मार्चनंतर संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याची चेतावणीही दिली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा दौर्यावर असलेले पालकमंत्री उदय सामंत यांची महासंघाने भेट घेऊन चर्चा केली.