हानी झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई देऊ ! – कृषीराज्यमंत्री

डॉ. विश्‍वजीत कदम

विटा (जिल्हा सांगली) – गारपीट आणि अवेळी पाऊस यांमुळे झालेल्या हानीविषयी कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच त्याचा अहवाल येईल. त्यामुळे येत्या अधिवेशनात शेतकर्‍यांना हानी भरपाई देण्याविषयी निर्णय घेतले जातील, अशी माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी दिली. ते जिल्ह्यातील खानापूर येथे बोलत होते. डॉ. विश्‍वजीत कदम पुढे म्हणाले, ‘‘हानीच्या पंचनाम्याविषयी संबंधित जिल्हाधिकार्‍यांनाही सूचना दिल्या आहेत. हानी भरपाईचा अहवाल आल्यानंतर निश्‍चित साहाय्य करण्याविषयी भूमिका ठरवली जाईल. राज्य सरकारने यापूर्वी गेल्या वर्षी अवकाळीमुळे हानी झालेल्या पिकांसाठी १० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. यातील साडेपाच सहस्र कोटी रुपये शेतीसाठी वितरित करण्यात आले आहेत.’’