आज (माघ शुक्ल पक्ष नवमी या दिवशी) असलेल्या दासबोध जयंतीच्या निमित्ताने…
समर्थ रामदासस्वामींनी रचलेले मनाचे श्लोक आपण ऐकले आहेत आणि बर्याच जणांना तेे मुखोद्गतही आहेत. समर्थांनी प्रत्येकाने स्वतःच्या मनाला वेसण घालण्यासाठी हे श्लोक निर्मिले आहेत. त्यातील अनेक श्लोकांचे भावार्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेशी साधर्म्य साधणारे आहेत. त्यामुळे येथे श्लोकांच्या समवेत स्वभावदोष निर्मूलनासाठी असणारा भावार्थ दिला आहे.
१. बुद्धीच्या अडथळ्यांमुळे स्वभावदोष वाढणे
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १
भावार्थ : पहिल्या श्लोकात समर्थ रामदासस्वामींनी गुण आणि बुद्धी यांची देवता असलेल्या गणेशाला अन् सर्व भाषांवर प्रभुत्व असलेल्या शारदादेवीला वंदन केले आहे. त्यांनी श्रीरामाला ‘त्या मार्गाने मला ने’, अशी प्रार्थना केली आहे. मनुष्यामध्ये असणारे स्वभावदोषही बुद्धीतील अडथळ्यांमुळे आणि अयोग्य भाषा वापरल्याने वाढतात.
२. सर्व निंदनीय कृतींचा त्याग करावा आणि वंदनीय कृतींचा अवलंब करावा !
मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरि पाविजेतो स्वभावें ।
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक २
भावार्थ : भक्तीमार्गाने जातांना स्वतःच्या स्वभावाकडे लक्ष असू द्यावे, म्हणजेच स्वभावदोष असू नयेत. हे साध्य करण्यासाठी सर्व निंदनीय कृतींचा त्याग करावा आणि वंदनीय कृतींचा अवलंब करावा.
३. पापबुद्धी आणि अनीती यांचा अंगीकार न करता गुणसंवर्धन करावे !
मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार विचार राहो ॥
– मनाचे श्लोक, श्लोक ४
भावार्थ : स्वभावदोषांमधील वासना, पापबुद्धी आणि अनीती नकोच, तर केवळ गुणच असावेत.
४. स्वभावदोेषांमुळेच पापवृत्ती निर्माण होते !
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्य संकल्प जीवी धरावा ।
मना कल्पना ते नको विषयांची ।
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥
– मनाचे श्लोक, श्लोक ५
भावार्थ : पाप करू नका. सत्याची कास धरा. विषयविकार जडू देऊ नका. स्वभावदोेषांमुळेच पापवृत्ती निर्माण होते.
५. स्वभावदोष आणि रिपू अंगीकारू नको !
नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ।
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥
– मनाचे श्लोक, श्लोक ६
भावार्थ : ‘मत्सर करणे, तसेच क्रोध येणे’, हे स्वभावदोष अंगीकारू नको, म्हणजेच या स्वभावदोषांचे निर्मूलन होऊ दे.
६. नेहमी नम्र राहून बोलावे !
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावें ।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक ७
भावार्थ : कुणीही अपमान केला, तरी तोे सोसावा आणि नेहमी नम्र राहून बोलावे.
७. द्रव्याचा लोभ आणि स्वार्थीपणा नको !
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारिखे दु:ख मोठे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक ९
भावार्थ : द्रव्याचा लोभ आणि स्वार्थीपणा नको; कारण असे करणे म्हणजे ‘मनासारखे व्हावे’, असे वाटणे आहे. मनासारखे झाले नाही, तर त्याचे दुःख मोठे असते.
८. स्वतःच्या दुःखातही विवेकाने सुख मानावे !
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १०
भावार्थ : सर्वांवर श्रीरामासारखी प्रीती करावी. स्वतःच्या दुःखातही विवेकाने सुख मानावे.
९. देहबुद्धी सोडून विदेहीपणे जगत रहावे !
मना मानसी दुःख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १२
भावार्थ : दुःख, शोक किंवा चिंता करणे सोडून आणि देहबुद्धी सोडून विदेहीपणे जगत रहावे.
१०. आयुष्य कर्मयोगाच्या सिद्धांताप्रमाणे घडत असल्याने त्याचा खेद मानू नयेे !
मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १७
भावार्थ : मन सतत चिंता करत असते. जे घडायचे, ते कर्मयोगाच्या सिद्धांताप्रमाणे घडत असते. त्यामुळे त्याचा खेद मानू नयेे.
११. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया नामजपाएवढीच महत्त्वाची आहे !
जया नावडे नाम त्या यम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १०१
भावार्थ : तर्क-वितर्क करत राहिल्याने मनात विकल्प येतात; म्हणून नाम घेत रहावे. त्यानेच स्वभावदोष जाणार आहेत. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवत रहावे; कारण ती नामजपाएवढीच महत्त्वाची आहे.
१२. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला भक्तीभावाची जोड द्यावी !
मना सर्वदा सज्जनाचेनि योगे ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १०८
भावार्थ : स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला भक्तीभावाने कृतीची जोड द्यावी. कृतीविना केवळ बोलणे हितकारी नसते.
१३. मनमोकळेपणाने बोलण्याने क्रोधावर मात करता येते !
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा ।
जनीं सूखसंवाद सूखे करावा ॥
जगी तोचि तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १०९
भावार्थ : वादविवाद करणे सोडून द्यावे; कारण तो स्वभावदोष आहे. त्याऐवजी वाद संवाद, म्हणजे मनमोकळेपणाने बोलावे. त्यानेच संतापावर, अर्थात् क्रोधावर मात करता येते.
१४. अहंकार हे अनेक विकारांचे मूळ आहे !
तुटे वाद संवाद त्याते म्हणावे ।
विवेके अहंभाव याते जिणावे ॥
अहंतागुणे वाद नाना विकारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥
– मनाचे श्लोक, श्लोक ११०
भावार्थ : अहंकारामुळे कुणाशीही संवाद साधणे शक्य होत नाही. अहंकार हे अनेक विकारांचे मूळ आहे.
१५. संशयी वृत्तीमुळे आपलेे हित असणारे संवादही करणे शक्य होत नाही !
जनीं सांगता ऐकता जन्म गेला ।
परी वादवेवाद तैसाचि ठेला ।
उठे संशयो वाद हा दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥
– मनाचे श्लोक, श्लोक ११२
भावार्थ : समाजाला शिकवता शिकवता पूर्ण जन्म जातो; पण कुणाशीही संवाद साधला गेला नाही. संशयी वृत्तीमुळे आपलेे हित असणारे संवादही करणे शक्य होत नाही.
१६. इतरांना शिकवण्यापेक्षा स्वतः योग्य कृती करत रहावी !
फुकाचे मुखी बोलता काय वेचे ।
दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक ११४
भावार्थ : मुखाने सतत बोलत राहिल्यास, म्हणजे सतत शिकवण्याच्या भमिकेत राहिल्याने गर्व दिवसेंदिवस वाढतो, म्हणजेच अहं वाढतो; म्हणून केवळ शिकवण्यापेक्षा स्वतः योग्य कृती करावी.
१७. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून अहंकार नष्ट करावा !
तुटे वाद संवाद तेथे करावा ।
विवेके अहंभाव हा पालटावा ॥
जनीं बोलण्यासारखे आचरावे ।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक ११५
भावार्थ : नेहमी वाद-संवाद करत रहावे आणि विवेकाने, म्हणजेच स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून अहंकार नष्ट करावा. योग्य बोलण्याप्रमाणेच आचरण असावे आणि त्यासाठी भक्तीभाव वाढवावा.
१८. षड्रिपूंना गोंजारत राहिल्याने अहंकार जन्माला येतो आणि तो नष्ट करणे कठीण वाटू लागते !
सदा वीषयो चिंतिता जीव जाला ।
अहंभाव अज्ञान जन्मास आला ॥
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ।
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १४५
भावार्थ : सतत विषयांना, म्हणजे षड्रिपूंना गोंजारत राहिल्याने अहंकार जन्माला येतो. त्यालाच चिकटून राहिल्यास अहंकारावर, म्हणजेच ‘स्वभावदोषांवर औषध नाही’, असे वाटायला लागते आणि असेच जीवन जगत रहावे लागते.
१९. अहंकारामुळे अन्नाचे पचन होत नाही !
जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची ।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची ।
अहंभाव ज्या मानसीचा विरेना ।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १५९
भावार्थ : अहंकार असेल, तर भोजनात रुची नसते. त्यामुळे अन्नाचेही पचन होत नाही.
२०. सतत शिकण्याच्या स्थितीत रहावे !
नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना भेद नाना विकारी ॥
नको रे मना शीकवू पूढिलांसी ।
अहंभाव जो राहिला तूजपासी ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १६०
भावार्थ : केवळ सतत इतरांना शिकवत राहिल्यास अहंभाव स्वतः समवेतच राहील, म्हणजेच सतत शिकण्याच्या स्थितीत रहावे.
समर्थ रामदासस्वामींप्रमाणे स्वतःच्या मनाला वेसण घालण्याचा प्रयत्न करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवूया. साधकांसाठी तेच समर्थ रामदासस्वामी आहेत.
गुरुमाऊलीने सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणांवर अर्पण करतो.’
– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, अमरावती (५.१.२०२०)