अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

माघ शुक्ल पक्ष चतुर्थी (१५ फेब्रुवारी) या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या चौथ्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच ईश्‍वर आहेत, याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया. 

(भाग ५)

भाग ४ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/451302.html


१३. वर्ष २००१

डॉ. रूपाली भाटकार

‘साधिकेला साधना करता यावी’, यासाठी गुरुदेवांनी तिचे घोर प्रारब्ध लवकर संपवल्याची अनुभूती येणे : माझे वैवाहिक जीवन अत्यंत खडतर होते आणि त्याचा शेवट घटस्फोटात झाला. घटस्फोटानंतर एकदा मी सुखसागर येथे सेवा करत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘हे कठीण वैवाहिक आयुष्य मला संपूर्ण जीवनभर जगावे लागले असते; मात्र घटस्फोटामुळे मी त्यातून बाहेर पडू शकले.’ हे ज्या सहजपणे घडून आले, त्याचे मला आश्‍चर्य वाटत होते. त्याच क्षणी परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी मला भाषांतरासाठी काही लिखाण दिले. त्या लिखाणातील एका परिच्छेदात ‘गुरुकृपेने प्रारब्ध लवकर न्यून होते’, असे वाक्य होते. नेमके हेच माझ्या जीवनात घडले होते. ‘मला साधना करता यावी’, यासाठी गुरुदेवांनी माझे घोर प्रारब्ध लवकर संपवले होते.

१४. वर्ष २००२

१४ अ. ‘एका ग्रंथावर सहसंकलक म्हणून तुमचे नाव घालूया का ?’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला विचारणे, त्यावर ‘हे सर्व मी सेवा म्हणून केले आहे आणि मला कोणत्याही कौतुकाची अपेक्षा नाही’, असे साधिकेने सांगितल्यावर ‘अध्यात्मात हेच अपेक्षित आहे’, असे त्यांनी सांगणे : एकदा मी सुखसागर येथे बसून सेवा करत असतांना परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि मला म्हणाले, ‘‘तुम्ही ‘संमोहन उपचार’ या ग्रंथासाठी माझ्या ‘क्लिनिकल हिप्नोसिस जर्नल’ या ग्रंथातील काही भाग भाषांतरित अन् संकलित केलेला आहे. या ग्रंथावर सहसंकलक म्हणून तुमचे नाव घालूया का ?’’ त्यावर मी त्यांना ‘हे सर्व मी सेवा म्हणून केले आहे आणि मला कोणत्याही कौतुकाची अपेक्षा नाही’, असे सांगितले. काही वेळाने ते हसून म्हणाले, ‘‘तुम्ही जे केलेत, ते योग्य आहे. अध्यात्मात हेच अपेक्षित आहे.’’

१४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘शेजारच्या खोलीत चालू असलेल्या सत्संगाला उपस्थित रहा, मी तेथे येतो’, असे सांगणे, त्या वेळी ते तेथे स्थुलातून न येताही साधिकेला आनंद जाणवू लागणे आणि ‘तेथे सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर उपस्थित आहेत’, असे जाणवणे : एकदा मी फोंडा येथील सुखसागर येथे परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला गेले होते. त्या वेळी त्यांनी मला ‘शेजारच्या खोलीत चालू असलेल्या सत्संगाला उपस्थित रहा. मी तेथे येतो’, असे सांगितले. त्याप्रमाणे मी सत्संगाला जाऊन बसले. प्रथम मला ‘परात्पर गुरु डॉक्टर या सत्संगाला स्थुलातून उपस्थित रहातील’, असे वाटले आणि त्यामुळे मी त्यांची वाट पहात होते. काही वेळाने मला आनंद जाणवू लागला आणि ‘या सत्संगात सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर उपस्थित आहेत’, हे मला जाणवू लागले. त्या वेळी मला त्यांच्या ‘मी तेथे येतो’, या वाक्याचा भावार्थ लक्षात आला.

१५.  वर्ष २००३

१५ अ. नामदिंडीच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन होणे : ‘वर्ष २००३ मध्ये गोव्यात सर्वत्र नामदिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. एकदा फोंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका नामदिंडीत मी सहभागी झाले होते. नामदिंडीत आम्ही सर्व साधक ध्वनीक्षेपकावरून दिलेल्या सूचनांनुसार नामजप करत चालत होतो. वातावरण पुष्कळ आनंदमय झाले होते. आमची नामदिंडी फोंडा येथील सुखसागर येथून जाणार होती. त्या वेळी ‘तेथे प्रवेशद्वाराजवळ प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टर उभे रहाणार आहेत’, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. आम्ही सुखसागरच्या जवळ गेल्यावर ‘मला काय झाले ?’, हे माझे मलाच समजले नाही. अकस्मात् माझी भावजागृती होऊन मी मोठ्याने रडू लागले. माझ्या आत्म्याला ‘पुढील काही क्षणांत कुणाचे दर्शन होणार आहे’, याची जणू कल्पना आली होती. जेव्हा आम्ही सुखसागरच्या जवळ पोचलो, तेव्हा प्रवेशद्वारात उभे असलेले परात्पर गुरु डॉक्टरांच्या ठिकाणी मला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. सहस्र कोटी सूर्यांचे तेज असलेले त्यांचे ते सुंदर आणि भव्य रूप पाहून मी भारावून गेले. श्रीकृष्णरूपी परात्पर गुरुदेवांच्या हातात केवळ बासरी आणि मस्तकावर मुकूट नव्हता.

१५ अ १. वरील अनुभूती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगण्यासाठी सुखसागर येथे जाणे, दुपारच्या वेळी त्यांच्या विश्रांतीच्या वेळी त्यांना जाग येऊ नये; म्हणून हळूवारपणे चालत गेल्यावरही त्यांनी खोलीतून बाहेर येऊन ‘मी तुमचीच वाट पहात होतो, ‘तुम्ही येणारच’, हे मला ठाऊक होते’, असे म्हणणे : मी इतर साधकांच्या समवेत दिंडीत चालत होते; पण त्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते, तसेच मी देहभानही विसरले होते. ५ – १० मिनिटांनी मी सामान्य स्थितीला आले आणि ‘मी काय पाहिले ?’, याची मला जाणीव झाली. मला अत्यानंद झाला होता; पण माझी ही स्थिती कुणीही समजू शकले नसते. नामदिंडी संपेपर्यंत दुपार झाली होती. ‘दुपारी परात्पर गुरुदेव विश्रांती घेतात’, हे मला ठाऊक होते. मी अस्वस्थ झाले होते. मला गुरुदेवांना भेटून ही अनुभूती सांगायची होती. त्यामुळे दुपारचे २.३० वाजले असूनही मी सुखसागर येथे जाण्याचा निर्णय घेतला. तेथे पोचल्यावर मी त्यांना जाग येऊ नये; म्हणून आवाज न करता हळूवारपणे चालत आत गेले; मात्र गुरुदेव त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले, ‘‘मी तुमचीच वाट पहात होतो. ‘तुम्ही येणारच’, हे मला ठाऊक होते.’’

१५ अ २. त्यानंतर प्रत्येक वेळी ही अनुभूती आठवल्यावर भाव जागृत होणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर हेच श्रीकृष्ण आहेत’, हे अंतर्मनावर कायमचे कोरले जाणे : त्यानंतर प्रत्येक वेळी ही अनुभूती आठवल्यावर माझा भाव जागृत होतो. ‘मला प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक जगद्गुरु श्रीकृष्णाने काही क्षण त्याच्या मूळ स्वरूपात दर्शन दिले’, यासाठी मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. अशी आहे आपल्या गुरुदेवांची महानता ! या अनुभूतीनंतर ‘परात्पर गुरु डॉक्टर हेच श्रीकृष्ण आहेत’, हे माझ्या अंतर्मनावर कायमचे कोरले गेले.

१५ अ ३. यानंतर मी गुरुदेवांना ‘तुम्हीच श्रीकृष्ण आहात’, हे मला ठाऊक आहे’, असे म्हणत असे. त्यावर ते नम्रतेने म्हणत, ‘‘नाही, माझ्यात विष्णुतत्त्व अधिक असल्याने तुम्हाला तसे वाटत आहे.’’

१५ आ.  नोव्हेंबर २००३ – एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर रागावून एका भागवत सप्ताहाला जाणे, तेथील प्रवचनकारांनी मूळ विषय सोडून ‘गुरूंवर अविश्‍वास दाखवू नका. ते जे काही करत आहेत, त्यातच तुमचे हित आहे’, असे सांगणे, त्या वेळी भावजागृती होऊन नामजप अखंडपणे होऊ लागणे आणि ‘गुरुदेवांचे आपल्यावर लक्ष आहे’, याची जाणीव होणे : एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांवर रागावले होते. ‘ते माझ्या पूर्वीच्या यजमानांना मला न्यायालयात त्रास न देण्याविषयी का सांगत नाहीत ?’, असे मला वाटत होते. (काही दिवसांनी  ‘ते साक्षीभावात असल्यामुळे माझ्या प्रारब्धात कोणताही हस्तक्षेप करणार नाहीत’, याची मला जाणीव झाली.) मी गुरुदेवांच्या छायाचित्राशी बोलत म्हणाले, ‘मी तुमच्यावर रागावले आहे. येथून पुढे मी कोणतीही सेवा करणार नाही.’ त्यानंतर मी एका भागवत सप्ताहाला गेले. मी सभागृहात प्रवेश केल्यावर ते प्रवचनकार मूळ विषय सोडून गुरूंविषयी बोलू लागले. ‘ते केवळ माझ्यासाठी हा विषय सांगत आहेत’, असे मला वाटले. प्रवचनकार म्हणाले, ‘‘गुरूंवर अविश्‍वास दाखवू नका. ते जे काही करत आहेत, त्यातच तुमचे हित आहे.’’ हे वाक्य ऐकून माझी भावजागृती झाली अन् माझा नामजप अखंडपणे होऊ लागला. ‘त्या सभागृहात इतर कुणीही नसून केवळ मी आणि परात्पर गुरु डॉक्टर, असे आम्ही दोघेच आहोत’, असेच मला जाणवत होते. ‘मी कुठेही असले, तरी गुरुदेवांचे माझ्यावर सूक्ष्मातून लक्ष आहे’, याची मला जाणीव झाली.’

(क्रमशः)

– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑगस्ट २०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक