अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

माघ शुक्ल पक्ष तृतीयेला (१४ फेब्रुवारी या दिवशी) प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या तिसर्‍या भागात आपण साधिकेने अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रीती आणि ते ईश्‍वरच आहेत याविषयी आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

(भाग ४)

भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/450968.html


डॉ. रूपाली भाटकार

१०. वर्ष १९९८ – १९९९

१० अ. गोव्यातील पहिल्या जाहीर सभेच्या वेळी व्यासपिठावरील परात्पर गुरु डॉ. आठवले विराट रूपात दिसणे : ‘गोवा राज्यातील पहिली जाहीर सभा पणजी येथील इ.डी.सी मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेला १० सहस्रांहून अधिक लोक उपस्थित होते. जेव्हा सभेला संबोधित करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले व्यासपिठावर गेले, तेव्हा मला ते विराट रूपात दिसले. या सभेला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सनातन संस्थेने कधीही मागे वळून पाहिले नाही. संस्थेच्या वतीने गोवा आणि भारतातील अन्य राज्ये यांत आयोजित करण्यात येत असलेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला.

१० आ. गोव्यातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शेवटच्या जाहीर सभेच्या वेळी एका साधिकेने त्यांनी रचलेले शक्तिस्तवन म्हणणे आणि त्या वेळी ‘संपूर्ण सभेवर चैतन्याच्या वर्षाव होत आहे’, असे जाणवणे : वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी पेडणे येथे घेतलेली सभा ही त्यांची शेवटची जाहीर सभा होती. ही सभाही अत्यंत दैवी होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः रचलेले शक्तिस्तवन या सभेत एका साधिकेला गायला सांगितले. हे शक्तिस्तवन चालू असतांना ‘संपूर्ण सभेवर चैतन्याच्या वर्षाव होत आहे’, असे मला जाणवले. हे शक्तिस्तवन ऐकतांना अशी अनुभूती मला पुन्हा कधीच आली नाही.

११. वर्ष १९९९

११ अ. एकदा निर्विचार स्थितीत असतांना स्वतःला त्याची जाणीव नसणे आणि तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सध्या तुम्ही आनंदाची अनुभूती घेत आहात’, असे सांगणे : मला ‘निर्विचार स्थिती म्हणजे काय ?’, हे ठाऊक नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांनी दोन प्रसंगांत मला याची जाणीव करून दिली. एका प्रसंगात मी निर्विचार स्थिती अनुभवत होते; पण मला त्याची जाणीव नव्हती. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘आता काय विचार करत आहात ?’, असे विचारले आणि म्हणाले, ‘‘सध्या तुम्ही आनंदाची अनुभूती घेत आहात.’’ मी फारशी साधना करत नसतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मला ही अनुभूती आली.

११ आ. सप्टेंबर १९९९ – आईला ‘न्यूमोनिया’ झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिला भेटायला रुग्णालयात येणे आणि ते भेटून गेल्यावर आई बरी होणे : या कालावधीत माझ्या आईला ‘न्यूमोनिया (फुफ्फुसाचा दाह)’ झाल्यामुळे रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर दोनापावला सेवाकेंद्रातील काही साधकांच्या समवेत तिला भेटायला आले होते. गुरुदेवांनी ‘भेटायला येतो’, असे कळवल्यावर माझ्या आईची प्रकृती सुधारू लागली. तिला लावलेला ‘नेब्युलायझर’ (औषधाची वाफ फुफ्फुसामध्ये नेणारे उपकरण) बंद करण्यात आला. परात्पर गुरुदेव भेटून गेल्यावर ती संपूर्णपणे बरी झाली.

११ इ. दिवाळी १९९९ – दिवाळीत श्रीकृष्णाला आवडणारे गोव्यातील स्थानिक पदार्थ बनवून ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी सेवाकेंद्रात पाठवणे, याविषयी त्यांना काहीही ठाऊक नसतांना ‘रूपाली मला भोजन पाठवणार आहे. मी त्याचीच वाट पहात आहे’, असे सांगून त्यांनी भोजन करण्यास नकार देणे आणि साधिकेने पाठवलेल्या पदार्थांचा त्यांनी स्वीकार करणे : या दिवाळीत मी श्रीकृष्णाला आवडणारे गोव्यातील स्थानिक पदार्थ, म्हणजे दूध आणि नारळाच्या रसातील पोहे, चण्याची उसळ, आंबाड्याची चटणी (गोव्यात याला ‘करम’म्हणतात.) आणि केळ्याचा हलवा बनवले होते. मी या सर्व पदार्थांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर ठेवून त्यांना नैवेद्य दाखवला आणि नंतर ते सर्व पदार्थ बांधून दोनापावला सेवाकेंद्रात त्यांच्यासाठी पाठवले. तिकडे सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांनी भोजन ग्रहण केले नव्हते. त्यामुळे साधक त्यांना जेवायचा आग्रह करत होते. ‘रूपाली मला भोजन पाठवणार आहे. मी त्याचीच वाट पहात आहे’, असे सांगून ते भोजन करण्यास नकार देत होते. मी त्यांना भोजन पाठवण्याविषयी त्यांच्याशी काहीही बोलले नव्हते; पण तरीही ते वाट पहात होते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मी श्रद्धायुक्त अंतःकरणाने पाठवलेल्या भोजनाचा स्वीकार केला’, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

१२. वर्ष २०००

१२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात ‘श्‍वासाला जोडून नामजप कसा करायचा ?’, हे शिकवणे आणि त्यांच्या उपस्थितीत हा सत्संग संपेपर्यंत सहजपणे तसा नामजप करता येणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी फोंडा (गोवा) येथील सुखसागर आश्रमातील एका सत्संगात ‘श्‍वासाला जोडून नामजप कसा करायचा ?’, हे शिकवले. मला यापूर्वी कधीही नामजप श्‍वासाला जोडून करणे जमले नव्हते; मात्र त्यांच्या उपस्थितीत हा सत्संग संपेपर्यंत मला सहजपणे आणि विनासायास असा नामजप करता आला. या नामजपामुळे मला पुष्कळ आनंद मिळाला.

१२ आ. मार्च २००० – वडिलांच्या इच्छेप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले जेवायला घरी येणे आणि त्या प्रसंगाच्या वेळी काढलेले छायाचित्र छायाचित्रांच्या संग्रहात लावण्यापूर्वी त्याला ‘ब्रह्मांडनायकाने आमच्या घराला दिलेली भेट !’ अशा आशयाचा मथळा देणे : माझ्या वडिलांना परात्पर गुरु डॉक्टरांना घरी जेवायला बोलवायची पुष्कळ इच्छा होती; पण त्यांना आमंत्रण देतांना आम्हाला संकोच वाटत होता. एकदा अकस्मात् ते म्हणाले, ‘‘तुमच्या बाबांची ‘मी तुमच्या घरी जेवायला यावे’, अशी इच्छा आहे. हो ना ? मी नक्की येईन.’’ ते आमच्या घरी आले आणि त्यांच्या दैवी अस्तित्वाने आमचे घर पावन झाले. मी या प्रसंगाचे छायाचित्र काढले होते. हे छायाचित्र माझ्या वैयक्तिक छायाचित्रांच्या संग्रहात लावण्यापूर्वी त्याला ‘ब्रह्मांडनायकाने आमच्या घराला दिलेली भेट !’ अशा आशयाचा मथळा दिला. हा मथळा मला आतून स्फुरला होता आणि त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असे महर्षींनी सांगितलेही नव्हते.

१२ इ. १७ डिसेंबर २००० – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १५ वर्षांपूर्वी ‘ते ८५ वर्षांपर्यंत जगणार’, असे सांगणे आणि ते महर्षींनी नाडीपट्टीद्वारे केलेल्या भविष्यकथनाशी तंतोतंत जुळणे : एकदा मी माझ्या एका गुंतवणुकीला वारसदार म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांचे नाव देण्याचा विचार केला होता. हा विचार त्यांना सांगितल्यावर ते हसून म्हणाले, ‘‘तुम्हाला ते पालटावे लागेल; कारण मी तुमच्या आधी जाणार आहे. मी आणखीन केवळ २७ वर्षे जगेन.’’ या प्रसंगाच्या वेळी ते ५८ वर्षांचे होते, म्हणजे ते वयाच्या ८५ व्या वर्षापर्यंत जगणार आहेत. परात्पर गुरुदेवांचे हे उद्गार या प्रसंगानंतर कित्येक वर्षांनी महर्षींनी नाडीपट्टीद्वारे केलेल्या भविष्यकथनाशी तंतोतंत जुळतात.’

(क्रमशः)

लेखाचा पुढील भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/451791.html

– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑगस्ट २०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक