कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा २२ वा वर्धापनदिन ‘ऑनलाईन’ पद्धतीने उत्साहात साजरा !

  • मुख्यमंत्री. बी.एस् येडियुरप्पा यांच्याकडून शुभसंदेश

  • ३० सहस्र लोकांनी पाहिला ‘ऑनलाईन’ कार्यक्रम

कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या वेळी दीपप्रज्वलन करतांना सनातन संस्थेचे पू. रमानंद गौडा

मंगळुरू (कर्नाटक) – कन्नड भाषेतील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा २२ वा वर्धापनदिन ‘ऑनलाईन’ पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून दक्षिण कन्नड जिल्ह्याचे करिंजे मठाचे श्री श्री मुक्तानंद स्वामी, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, युवा ब्रिगेड या संघटनेचे संस्थापक श्री. चक्रवर्ती सूलेबेले, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा, तसेच ‘सनातन प्रभात’चे मुख्य प्रतिनिधी श्री. प्रशांत हरिहर यांनी मार्गर्शन केले. या कार्यक्रमाला राज्यातील वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिली. फेसबूक आणि यू ट्यूब यांद्वारे प्रसारित केलेल्या या कार्यक्रमाला ३० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या प्रारंभी पू. रमानंद गौडा यांनी दीपप्रज्वलन केले. तसेच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकांचे प्रकाशन केले.

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियूरप्पा यांनी पाठवलेला संदेश, तसेच श्रीक्षेत्र धर्मस्थळाचे धर्माधिकारी डॉ. डी. वीरेंद्र हेगडे, उडुपी पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामी, शिवमोग्गाचे रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे पू. स्वामी विनयानंद सरस्वती, हळदीपूर मठाचे श्री वामनाश्रम स्वामी यांनी पाठवलेल्या संदेशांचे वाचन करण्यात आले.

मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन

‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैचारिक शक्ती पुरवत आहे ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना

‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राविषयी गावागावांत जनजागृती करणे, अध्यात्म, राष्ट्रीयता, धर्मशिक्षण, तसेच धर्मावर होणारे आघात यांविषयी जनजागृती करून राष्ट्ररक्षणाचे कार्य करत आहे. हिंदूंना ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ यांविषयी वैचारिक शक्ती पुरवत आहे.

हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे  ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक ! – चक्रवर्ती सूलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड

कुठलाही उद्योजक, राजकीय पक्ष यांचा पाठिंबा नसतांना केवळ भगवंताच्या कृपेने गेल्या २२ वर्षांपासून अत्यंत स्पष्टपणे हिंदु राष्ट्राविषयी, हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकाने धर्मजागृतीचे कार्य अविरतपणे पुढे चालवावे ! – बी.एस्. येडियुरप्पा मुख्यमंत्री, कर्नाटक

कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या २२वा वर्धापनदिन साजरा करत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. गेल्या २ दशकांपासून कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि मराठी या भाषांमध्ये संपूर्ण राष्ट्रात अविरतपणे राष्ट्रजागृती, धर्मजागृती आणि समाजाभिमुख कार्य हे नियतकालिक करत आहे. आम्हाला साधनेच्या मार्गाकडे घेऊन जाऊन आमच्या जीवनाचे सार्थक करणारे अर्थपूर्ण लेख, धर्मशिक्षणाची माहिती, आध्यात्मिक साधना, संस्कार, आयुर्वेद इत्यादी माहिती देऊन लोकांमध्ये धर्माभिमान जागृत करण्यात सफल झालेले हे नियतकालिक प्रशंसेस पात्र आहे. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाने धर्मजागृतीचे कार्य अविरत पुढे चालवावे,  हीच शुभेच्छा !

‘सनातन प्रभात’ नियतकालिक सर्व वर्गातील प्रशंसेला पात्र झाले आहे ! – श्री क्षेत्र धर्मस्थळाचे धर्माधिकारी डॉ. डी. वीरेंद्र हेगडे

‘सनातन प्रभात’ नियतकालिक गेली २२ वर्षे यशस्वीपणे सार्थक सेवा करून २२ वा वर्धापनदिन साजरा करत असल्याचे पाहून आनंद झाला. हा समारंभ यशस्वी रीतीने पार पडू दे ही हार्दिक शुभेच्छा !

सामाजिक तळमळीने तुम्ही वाचकांना उपयुक्त माहिती, मार्गदर्शन देण्यासह आध्यात्मिक उन्नती आणि धर्मजागृतीचे लेख प्रकाशित करता हे स्तुत्य आहे. तुमचे नियतकालिक सर्व वर्गातील वाचकांच्या आवडीला पात्र झाले आहे, याविषयी अभिनंदन !

सहृदय वाचकांच्या प्रोत्साहन सहकार्यासह नियतकालिकाची उत्तरोत्तर प्रगती होवो, असा आशीर्वाद श्री मंजुनाथ स्वामींनी द्यावा, अशी प्रार्थना करतो.