कर्जफेडीसाठी अधिकोषाने पूजा चव्हाण यांना कधीच नोटीस पाठवली नाही !

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अधिक माहिती उजेडात

पूजा चव्हाण

बीड – पूजा चव्हाण यांनी एका अधिकोषाकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे ती तणावात होती. त्यातून तिने आत्महत्या केली असावी, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे; परंतु अधिकोषाकडून एकही नोटीस पूजा हिच्या कुटुंबियांना आली नसल्याचे समोर आले आहे. पूजा चव्हाण आणि तिच्या कुटुंबियांनी वर्ष २०१८ मध्ये कुक्कुट पालनासाठी १३ लाख ५० सहस्र रुपयांचे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले होते. कोरोनाचा संकटाचा काळ आणि दळणवळण बंदीत त्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला होता. दळणवळण बंदीमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने अधिकोषाचे हप्ते भरले गेले नव्हते. असे असतांनाही अधिकोषाकडून पूजा चव्हाण हिच्या कुटुंबियांना कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही, तसेच अधिकोषाने कर्ज वसुलीसाठी तगादाही लावला नाही, अशी माहिती या अधिकोषातील एका कर्मचार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

पूजा चव्हाण हिने आतापर्यंत बँकेचे १२ हप्ते भरले होते. तिला घेतलेल्या कर्जावर अधिकोषाकडून २ लाख ७० सहस्र रुपयांचे अनुदान मिळाले होते. या कर्जासाठी पुजाच्या कुटुंबियांनी १ एकर भूमी आणि वसंत नगर तांडा येथील रहाते घर अधिकोषाकडे तारण ठेवले होते.

‘आपलेच दात आणि आपलेच ओठ !’ – हरिभाऊ राठोड, माजी आमदार

नागपूर – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाविषयी काय बोलायचे ? ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ आहेत. माझा संजय राठोड यांच्याशी संपर्क झालेला नाही. जर माझा संपर्क झाला, तर मी त्यांना या प्रकरणाच्या संदर्भात विचारणा करीन, असे याविषयी बंजारा समाजाचे नेते आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड म्हणाले.