पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सखोल अन्वेषण करण्याची भाजप नेत्यांची मागणी

फडणवीस यांनी १२ ध्वनीफीती पोलिसांकडे सादर केल्या

मुंबई – बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीने ८ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथील वानवडी भागात आत्महत्या केली. या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या एका नेत्याचे नाव समोर येत आहे. त्यामुळे भाजपकडून या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी करण्यात येत आहे; मात्र विरोधक आणि प्रसार माध्यमांतून होत असलेल्या आरोपांविषयी संबंधित नेत्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, तसेच त्यांचा भ्रमणभाषही बंद आहे.

३ दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण या युवतीच्या काही ध्वनीफीती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना १२ फेब्रुवारी या दिवशी सादर केल्या. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून घटनेचा उलगडा करावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

पोलिसांनी सुमोटो अंतर्गत तक्रार प्रविष्ट करत संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. ‘एवढे पुरावे असतांनाही मुख्यमंत्री मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहात आहेत ?’, अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे.

पुणे – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश देण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रकार परिषदेत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या युवतीने आत्महत्या करून अनेक घंटे लोटूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या युवतीच्या कुटुंबियांनी तक्रार द्यायला हवी, असे पोलिसांचे म्हणणे आहे; मात्र राज्य सरकारला सुमोटो तक्रार प्रविष्ट करून घेता येत नाही का ?, असा प्रश्‍न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.