‘१२.२.२०२१ या दिवसापासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, शिशिरऋतू, माघ मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. गणेशजयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी (शिवपूजन) : माघ शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला ‘गणेशजयंती’ साजरी करतात. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवतात; म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असे म्हणतात. या दिवशी कुंदपुष्पांनी शिवपूजन करतात.
२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १५.२.२०२१ या दिवशी दुपारी २.४४ पासून उत्तररात्री ३.३७ पर्यंत आणि १९.२.२०२१ या दिवशी सकाळी १०.५९ पासून उत्तररात्री १२.१७ पर्यंत विष्टी करण आहे.
२ इ. वसंतपंचमी, श्री पंचमी, रति आणि कामदेव पूजन : माघ शुक्ल पक्ष पंचमीला ‘वसंतपंचमी’ असे म्हणतात. या दिवशी रति आणि कामदेव यांचे पूजन केले जाते. या पंचमीला देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांचे पूजन करतात; म्हणून या पंचमीला ‘श्री पंचमी’ असे म्हणतात.
२ ई. अमृत योग : अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. १६.२.२०२१ या दिवशी हा योग रात्री ८.५६ नंतर दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत आणि २०.२.२०२१ या दिवशी अहोरात्र (संपूर्ण दिवस आणि रात्र) आहे.
२ उ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १६.२.२०२१ या दिवशी उत्तररात्री ६.४७ पासून १७.२.२०२१ रात्री ११.४९ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ऊ. दग्ध योग : दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. १६.२.२०२१ या दिवशी मंगळवार असून उत्तररात्री ५.४७ पर्यंत पंचमी तिथी आहे. १८.२.२०२१ या दिवशी गुरुवार असून सकाळी ८.१८ पर्यंत षष्ठी तिथी आहे. १९.२.२०२१ या दिवशी शुक्रवार असून सकाळी १०.५९ नंतर सप्तमी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.
२ ए. मन्वादि : माघ शुक्ल पक्ष सप्तमी या तिथीला ‘मन्वादि योग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.
२ ऐ. मीनायन : १८.२.२०२१ या दिवशी सायंकाळी ४.१३ मि. नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्त्य पद्धतीनुसार) मीन राशीत प्रवेश करत आहे.
२ ओ. यमघंट : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने ‘यमघंट योग’ होतो. १८.२.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.५४ पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत कृत्तिका नक्षत्र आणि गुरुवार एकत्र आल्याने अन् १९.२.२०२१ या दिवशी उत्तररात्री ५.५७ पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत रोहिणी नक्षत्र आणि शुक्रवार एकत्र आल्याने ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. या योगावर कधीही प्रवास करू नये.
२ औ. रथसप्तमी : माघ मासात सूर्योदय व्यापिनी शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ साजरी केली जाते. या दिवशी सूर्याच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. सूर्याची प्रतिमा नसल्यास गंधाने सूर्यदेवतेचे चित्र काढून पूजन केले जाते. शेणाच्या गोवर्या पेटवून त्यांवर मातीच्या सुगडात दूध ठेवून ते सूर्याला अर्पण केले जाते. सूर्यापासून आरोग्य प्राप्त होत असल्याने या दिवसाला ‘आरोग्य सप्तमी’ असेही म्हणतात. या दिवशी रथाधिष्ठित सूर्याचे पूजन करून सूर्यनमस्कार घालतात. या दिवसाला ‘जागतिक सूर्यनमस्कार दिन’ म्हणतात.
२ अं. भीष्माष्टमी : माघ मासात अपराण्ह काळी असलेल्या शुक्ल अष्टमीला भीष्माष्टमी म्हणतात. या दिवशी भीष्माचार्यांनी प्राणत्याग केला; म्हणून या दिवशी त्यांच्यासाठी तर्पण करून त्यांचे स्मरण करतात.
२ क. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (दिनांकाप्रमाणे) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिनांकाविषयी अनेक मतभेद आहेत. ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे १९.२.१६३० हा त्यांचा जन्मदिनांक निश्चित केला आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (७.२.२०२१)